देशांतर्गत क्रिकेटमधील मानाची क्रिकेट स्पर्धा असलेल्या रणजी करंडक स्पर्धेत सोमवारी एक जबरदस्त रेकॉर्ड रचला गेला. रणजी करंडक स्पर्धेतील साखळी सामन्यांच्या शेवटच्या दिवशी रेल्वेने सर्वाधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. त्रिपुराविरुद्ध झालेल्या या सामन्यात रेल्वेने ३७८ धावांच्या आव्हानाचा पाच गडी राखून यशस्वीरीत्या पाठलाग केला. रेल्वेकडून प्रथम सिंह (१६९ धावा) आणि मोहम्मद सैफ (१०६) यांनी रेल्वेच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
या सामन्यात त्रिपुराने रेल्वेसमोर विजयासाठी ३७८ धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान दिल्यानंतर त्रिपुराचा संघ निश्चिंत होता. कारण रणजी क्रिकेटमध्ये एवढ्या मोठ्या आव्हानाचा आतापर्यंत पाठलाग करता आला नव्हता. मात्र रेल्वेच्या फलंदाजांनी जबरदस्त खेळ करून विजयश्री खेचून आणली. रेल्वेने १०३ षटकांमध्ये ५ गडी गमावून ३७८ धावांचं लक्ष्य गाठलं.
रेल्वेच्या या विजयामध्ये प्रथम सिंह आणि मोहम्मद सैफ यांनी निर्णायक भूमिका बजावली. आयपीएलमध्ये कोलकाता नाईटरायडर्समध्ये समावेश असलेल्या प्रथम सिंह याने १६९ धावांची नाबाद खेळी केली. केकेआरने आयपीएल २०२२ च्या लिलावात प्रथम सिंह याला खरेदी केले होते. मात्र आता केकेआरने त्याला रिलिज केले आहे. प्रथम सिंहला मोहम्मद सैफ यानेही चांगली साथ दिली. त्याने १०६ धावांची खेळी केली.
आगरतळा येथे खेळवण्यात आलेल्या या सामन्यात यजमान त्रिपुराने पहिल्या डावात १४९ धावा काढल्या होत्या. त्यानंतर रेल्वेचा संघ पहिल्या डावात केवळ १०५ धावांवर गारद झाला होता. दुसऱ्या डावात त्रिपुराने ३३३ धावा कुटून रेल्वेसमोर विजयासाठी ३७८ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र रेल्वेने हे आव्हान जबरदस्त पाठलाग करून विजय मिळवला. मात्र या विजयानंतरही रेल्वेचा संघ रणजी करंडक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठू शकला नाही. क गटात रेल्वेचा संघ ७ सामन्यांत २४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर राहिला. तर त्रिपुरा ७ सामन्यांत १७ गुणांसह पाचव्या क्रमांकावर राहिला.
याआधी रणजी करंडक स्पर्धेत याआधी सर्वाधिक धावांचा पाठलाग करताना विजय मिळवण्याचा रेकॉर्ड सौराष्ट्रच्या नावावर होता. सौराष्ट्रने ४ वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशविरुद्ध ३७२ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. तर आसामच्या संघानेही एकदा ३७० धाावांचा यशस्वी पाठलाग केला होता.
Web Title: KKR got the biggest win for Railways in the chase of the batsman dropped
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.