Join us  

तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 

गौतम गंभीरने जोरदारपणे हार्दिक पांड्याचा बचाव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 4:42 PM

Open in App

कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) याने हार्दिक पांड्यावर टीका करणाऱ्या एबी डिव्हिलियर्सला ( AB de Villiers ) फटकारले आहे. एबी डिव्हिलियर्स हा हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर भाष्य करण्यास योग्य नाही, कारण त्याने आयपीएलमध्ये कोणत्याही संघाचे नेतृत्व केले नाही, असे गंभीर म्हणाला. हार्दिक मैदानावर नाटकी वागतो आणि मुंबई इंडियन्सच्या वरिष्ठ खेळाडूंना ते आवडत नाही, एबीच्या या विधानावर गंभीर प्रचंड संतापला. 

गंभीरने जोरदारपणे हार्दिकचा बचाव केला. तो म्हणाला, हार्दिकच्या कर्णधारपदाखाली पहिल्या सत्रात मुंबई इंडियन्सला अपयश येणे पूर्णपणे ठीक आहे. हार्दिकला त्याची रणनीती मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात अवलंबविल्यासाठी वेळ द्यायला हवा आणि त्याने तज्ज्ञांचे ऐकणे थांबवले पाहिले. "तज्ज्ञ काय म्हणत आहेत हे महत्त्वाचे नाही, बडबड करणे हे त्यांचे काम आहे. तुम्ही एखाद्याच्या कर्णधारपदाचे मुल्यांकन त्या संघाच्या कामगिरीवरून करायला हवं, हे माझं मत आहे. मुंबई इंडियन्सने चांगली कामगिरी केली असती, तर सर्वांनी त्याचे कौतुक केले असते. आज मुंबईने चांगली कामगिरी केली नाही आणि म्हणूनच प्रत्येकजण याबद्दल बोलत आहे," असे गंभीर म्हणाला.

"हार्दिक पांड्या दुसऱ्या फ्रँचायझीमधून आला आहे, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्याला वेळ द्या. गुजरात टायटन्सचा दोन वर्षे कर्णधार राहिल्यानंतर तो मुंबईत आला आणि त्याच्याकडून लगेच अपेक्षा करणे चुकीचे आहे. तो चांगली कामगिरी करू शकला असता. पण, त्याला चांगली कामगिरी करता आली नाही, त्यात गैर काही नाही. त्याला थोडा वेळ द्या,"असेही तो पुढे म्हणाला.

गंभीरने केव्हिन पीटरसन आणि एबी डिव्हिलियर्स यांच्यावर टीका सुरूच ठेवली. "त्याला दररोज, प्रत्येक सामन्यात जज करणे बरोबर नाही. ज्या तज्ञांनी त्याच्यावर टीका केली आहे, त्यांनी एखाद्या संघाचे कर्णधार असताना त्यांची कामगिरी पाहिली पाहिजे. मग तो एबी डिव्हिलियर्स असो किंवा केव्हीन पीटरसन. त्यांची करिअरमध्ये कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केलेली नाही, त्यांचे रेकॉर्ड पाहिले तर ते इतर कोणत्याही कर्णधारापेक्षा वाईट आहे,” असेही गंभीर म्हणाला. 

टॅग्स :आयपीएल २०२४गौतम गंभीरहार्दिक पांड्याएबी डिव्हिलियर्स