दुबई: केकेआरचा फलंदाज शेल्डन जॅक्सन याने गुरुवारी क्रिकेटमधील प्रवास कथन करताना रंजक किस्से सांगितले. तो म्हणाला,‘ काही वर्षांआधी क्रिकेटमध्ये यशस्वी झालो नसतो तर आज पाणीपुरी विकताना दिसलो असतो.’ ३४ वर्षांच्या जॅक्सनने २०११ ला स्थानिक क्रिकेटमधील अपयशानंतर क्रिकेट सोडण्याचा देखील विचार केला होता. बँकेत नोकरी करण्याचा त्याने निर्णय घेतला होता. मात्र त्याचवेळी या खेळात आणखी एक वर्ष थांबण्याचा त्याला सल्ला दिला.
मित्राचा हाच सल्ला जॅक्सनच्या कारकिर्दीला वळण देणारा ठरला. वयाच्या २५ व्या वर्षी क्रिकेट सोडून देण्याचा मनात विचार आला. एकही सामना न खेळता पाच वर्षे रणजी संघात होतो. त्याचवेळी घनिष्ठ मित्र शपथ शाह याने उत्साह वाढविला. तो म्हणाला,‘तू इतकी वर्षे या खेळात मेहनत घेतलीस. एक-दोन वर्षे आणखी मेहनत घे. यश आले नाही तर माझ्या कारखान्यात काम करू शकतोस.’ शेल्डन पुढे म्हणाला,‘त्यावर्षी मी प्रत्येक रेकॉर्ड मोडला. मी सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज होतो. टीम इंडियाचा अपवाद वगळता सर्वच संघातून खेळलो. एकाच मोसमात चार शतके ठोकली. त्यातही सलग तीन शतके होती. तेव्हापासून माझ्या करियरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.’