मुंबई : वानखेडे स्टेडियमवर बुधवारी तब्बल ४२२ धावांचा पाऊस पडलेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने १८ धावांनी बाजी मारताना कोलकाता नाईट रायडर्सचे कडवे आव्हान परतावले. चेन्नईकडून ॠतुराज गायकवाड आणि फाफ डूप्लेसिस यांनी चौफेर फटकेबाजी केली. यानंतर कोलकाताकडून दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल आणि पॅट कमिन्स यांनी तुफानी हल्ला करत चेन्नईवर पराभवाचे संकट निर्माण केले होते. मात्र, दडपणाच्या स्थितीत झालेल्या माफक चुकांमुळे कोलकाताला पराभव पत्करावा लागला. यावेळी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानेही छोटेखानी आक्रमक खेळी केली. यादरम्यान त्याने अशी कामगिरी केली, ज्याच्यावर चाहत्यांना विश्वास ठेवणे कठीण जात आहे. (KKR vs CSK: MS Dhoni hits a boundary against Sunil Narine for 1st time in IPL history)
धोनीने चेन्नईच्या डावातील १७व्या षटकात कोलकाताचा स्टार फिरकी गोलंदाज सुनील नरेन याला खणखणीत चौकार खेचला. धोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये नरेनविरुद्ध ६४ चेंडू खेळले आहेत आणि दखल घेण्याची बाब म्हणजे त्याने पहिल्यांदाच नरेनला चौकार खेचला.
एकूण टी-२० क्रिकेटचा विचार करता धोनीने याआधी एकदा नरेनला चौकार मारला होता. मात्र, हा एकमेव नरेनविरुद्धचा चौकार धोनीने चॅम्पियन लीग सामन्यात मारला होता. २ आॅक्टोबर २०१३ रोजी झालेल्या सामन्यात धोनीने ही कामगिरी केली होती. मात्र, आयपीएलमध्ये त्याने पहिल्यांदाच नरेनला चौकार मारण्याची कामगिरी केली. एकूण टी-२० क्रिकेटमध्ये धोनीने नरेनविरुद्ध ८३ चेंडू खेळले असून त्यामध्ये ४४ धावा केल्या आहेत. तसेच नरेनने धोनीला २ वेळा बादही केले आहे.
धोनीला गेल्या ११ आयपीएल सामन्यांत केवळ एकदाच ३०हून अधिक धावांची वैयक्तिक खेळी करता आलेली आहे. धोनी तब्बल सातवेळा २० हून कमी धावसंख्येची खेळी करुन बाद झाला आहे.