Indian Premier League ( IPL 2020) च्या प्ले ऑफच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकण्याच्या निर्धारानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) आणि कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) शारजाह स्टेडियमवर उतरले आहेत. दोन्ही संघांनी ६ पैकी ४ सामने जिंकून प्रत्येकी ८ गुणांची कमाई केली आहे. देवदत्त पडीक्कल आणि आरोन फिंच यांच्या सावध खेळीनंतर एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली यांनी अखेरच्या ५ षटकांत तुफान फटकेबाजी केली. एबीचं वादळ KKRच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. एबी-विराटनं ७.४ षटकांत १०० धावांची भागीदारी केली.
नाणेफेक जिंकून RCBनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. देवदत्त पडीक्कल आणि आरोन फिंच यांनी RCBला दमदार सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ६७ धावा जोडल्या. ८व्या षटकात आंद्रे रसेलनं ( Andre Russell) KKRला पहिले यश मिळवून दिले. त्यानं पडीक्कलचा त्रिफळा उडवला. पडीक्कल २३ चेंडूंत ३२ धावांवर माघारी परतला. फिंचला KKRच्या प्रसिध कृष्णानं माघारी पाठवले. फिंच ३७ चेंडूंत ४७ धावांवर त्रिफळाचीत झाला. KKRच्या गोलंदाजांनी RCBच्या धावगतीला वेसण घातले होते. बंगळुरूनं १५ षटकांत २ बाद १११ धावा केल्या होत्या.
फलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या शारजाहच्या खेळपट्टीवर वरूण चक्रवर्थीनं चार षटकांत २५ धावा दिल्या. १६व्या षटकापासून विराट आणि एबी डिव्हिलियर्स यांनी गिअर बदलला. एबीनं १६व्या षटकात दोन खणखणीत षटकार खेचले आणि १८ धावा चोपल्या. १७व्या षटकात पॅट कमिन्स गोलंदाजीला आला, पण एबीनं त्यालाही सोडलं नाही. त्या षटकात १९ धावांचा पाऊस पाडला. एबीनं २३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. आयपीएलमधील त्याचं हे ३६वे अर्धशतक ठरलं. १८व्या षटकात एबीनं १८ धावा चोपल्या. १९वे षटक टाकणाऱ्या कृष्णानं RCBचा धावांचा वेग किंचित कमी करत १२ धावा दिल्या. रसेलच्या अखेरच्या षटकात १७ धावा करून RCBनं २ बाद १९४ धावांचे आव्हान उभे केले. एबीनं ३३ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ७३, तर विराटनं नाबाद ३३ धावा केल्या.