Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात प्ले ऑफच्या शर्यतीत स्थान कायम राखण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यातला सामना एकतर्फी झाला. निराशाजनक सुरुवातीनंतर KKRचा कर्णधार इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) याच्या फटकेबाजीनं संघानं मोठा पल्ला गाठला. त्यानंतर RRची सुरुवात फार चांगली झाली नाही. पॅट कमिन्सनं आज त्याच्यासाठी मोजलेल्या पैशाचं मोल जपलं. त्यानं पहिल्या पॉवर प्लेमध्ये चार विकेट्स घेतल्या आणि RRला जबरदस्त धक्के दिले. त्यातून सावरणं त्यांना जमलंच नाही. KKR विजयाच्या उंबरठ्यावर असले तरी त्यांना प्ले ऑफमधील प्रवेश पक्कं करण्यासाठी एक गणित जुळवावे लागेल.
नितिश राणाच्या अपयशाचा पाढा याही सामन्यात कायम राहिला. जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. शुबमन गिल व राहुल त्रिपाठी यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी करताना KKRची गाडी रुळावर आणली. राहुल टेवाटियानं RRला कमबॅक करून दिलं. त्यानं गिल ( ३६) आणि सुनील नरीन ( ०) यांना सलग दोन चेंडूवर बाद केले. दिनेश कार्तिकही भोपळ्यावर टेवाटियाच्या गोलंदाजीवर माघारी परतला. विचित्र पद्धतीनं तो बाद झाला. आंद्रे रसेलनं ११ चेंडूंत ३ षटकार व १ चौकार मारून २५ धावा चोपल्या. कार्तिक त्यागीला सलग तिसरा षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. मॉर्गननं कॅप्टन इनिंग खेळताना ३५ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकार खेचून नाबाद ६८ धावा करताना संघाला ७ बाद १९१ धावांचा पल्ला गाठून दिला.
प्रत्युत्तरात रॉबीन उथप्पानं पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला. पण, त्या सहा धावांवरच तो माघारी परतला. पॅट कमिन्सनं त्याची विकेट घेतली. तिसऱ्या षटकात दिनेश कार्तिकनं अप्रतिम झेल घेताना बेन स्टोक्सचा माघारी जाण्यास भाग पाडले. स्टोक्स १८ धावाच करू शकला. स्टीव्ह स्मिथ ( ४) व संजू सॅमसन ( १) हेही झटपट मागे परतले. RRचा निम्मा संघ ३७ धावांवर माघारी परतला. KKRनं राजस्थान रॉयल्सला १११ धावांत गुंडाळल्यास ते थेट प्ले ऑफसाठी पात्र ठरतील, अन्यथा त्यांना सनरायझर्स हैदराबादच्या निकालाकडे लक्ष देऊन बसावे लागेल.