- अयाज मेमन(कन्सल्टिंग एडिटर)
केकेआरने आयपीएल २०२१ मध्ये यूएईतील दुसऱ्या टप्प्यात फारच उल्लेखनीय कामगिरी केली. लीगला सुरुवात झाल्यापासून केकेआर सातव्या स्थानी होता. नव्याने, आक्रमक आणि महत्त्वाकांक्षी मानसिकतेसह खेळून या संघाने राजस्थान, पंजाब आणि मुंबई इंडियन्सला पराभूत करीत प्ले ऑफच्या दिशेने कूच केली.
केकेआरची कामगिरी पाचवेळेचा चॅम्पियन मुंबईच्या तुलनेत फारच उजवी ठरली. दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली तेव्हा मुंबई संघ पहिल्या चारमध्ये होता. त्यावेळी हा संघ केवळ पात्र ठरणार नाही तर पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर असेल, असा अंदाज बांधला जात होता.मुंबईला कामगिरीची पार्श्वभूमी आहे. हा संघ मंद सुरुवात करतो, पण लय पकडली की त्यांना रोखणे कठीण जाते, असे हमखास चित्र असायचे. यंदा मात्र वेगळे चित्र दिसले. सुरुवातीच्या दोन पराभवानंतर अनेक चढ-उतार आले. सातत्यपूर्ण कामगिरीअभावी संघाला पात्रतादेखील गाठणे जड गेले आहे.
मुंबईच्या दारुण कामगिरीसाठी त्यांच्या आघाडीच्या फळीचा कमकुवत फॉर्म कारणीभूत ठरला. रोहित, पोलार्ड, हार्दिक हे फिनिशर आहेत, पण कामगिरीत माघारले. सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी पहिल्या टप्प्यातील कामगिरीची येथे पुनरावृत्ती केली नाही. हैदराबादविरुद्ध दोघांचीही बॅट तळपली खरी, पण तेव्हा वेळ निघून गेली होती. बेभरवशाची फलंदाजी आणि त्यामुळे निघालेल्या कमी धावा यामुळे गोलंदाजांचे काम कठीण झाले. स्वाभाविक आक्रमकतेचा बुमराह दिसलाच नाही. कुल्टर नाईल, बोल्ट, राहुल चहर आणि कृणाल पांड्या यांनी निराश केले.
केकेआरने मात्र अष्टपैलू पराक्रम, मजबूत महत्त्वाकांक्षा आणि धाडसी रणनीती या मुंबईशी संबंधित मानल्या जाणाऱ्या बाबी सिद्ध केल्या. नवोदित व्यंकटेश अय्यरने शुभमन गिलसोबत दमदार भागीदारी करीत शानदार सुरुवात करून दिली. त्रिपाठी आणि राणा यांचा भक्कम पाठिंबा मिळाला. यामुळे कर्णधार मोर्गनच्या अपयशाचा फारसा विपरीत परिणाम जाणवला नाही.
स्पर्धेच्या नियमानुसार पहिल्या प्ले ऑफमध्ये दिल्ली आणि चेन्नई एकमेकांविरुद्ध खेळतील. यातील विजेता संघ थेट फायनलसाठी पात्र ठरणार आहे. एलिमिनेटरमध्ये आरसीबी आणि केकेआर खेळणार आहेत. अंतिम फेरी निश्चित करण्यासाठी क्वालिफायरचा पराभूत संघ आणि एलिमिनेटरचा विजेता यांच्यात सामना खेळला जाईल.
संघांची स्थिती काय?दिल्ली कॅपिटल्स संघात उत्साही, तरुण प्रतिभावान तसेच शिखर धवन आणि अश्विन यासारखे अनुभवी दिग्गज आहेत. धवन, श्रेयस, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल आणि आवेश खान यांच्यासह कॅगिसो रबाडा, एन्रिच नोर्खिया आणि शिमरोन हेटमायर हे देखील उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत.
सीएसके संघ प्ले ऑफ जवळ आला आणि तीन सामन्यात पराभूत झाला. सलामीवीर ऋतुराज आणि डुप्लेसिस यांचा खेळ वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले आहेत. रैना आणि धोनी पूर्वीच्या फॉर्ममध्ये नाहीत. गोलंदाजीत ब्राव्हो हुशार आणि भेदक वाटतो, तरी सीएसके हमखास दावेदार वाटत नाही. मात्र तीनवेळेच्या चॅम्पियन्सकडे असलेला अनुभव स्थितीनुसार लाभदायी ठरू शकेल.
आरसीबी संघ फिट आणि स्टार्ट मागे पडला. केकेआरविरुद्ध पहिल्या सामन्यात ९२ धावात बाद होणे व नंतर राजस्थानविरुद्ध माफक लक्ष्य गाठण्यात आलेले अपयश यामुळे पहिल्या दोन स्थानापासून वंचित राहावे लागले. धावांवर बाद झाले आणि आरआरविरुद्ध माफक लक्ष्य पूर्ण करण्यात अपयश आल्यामुळे, त्यांना अव्वल २ मध्ये स्थान मिळाले. कोहलीने मोठी खेळी केली नाही, हे सत्य असले तरी त्यांच्याकडे डिव्हिलियर्स, मॅक्सवेल, भरत, हर्षल पटेल, युजवेंद्र आणि सिराज असे उपयुक्त खेळाडू आहेत. दिल्लीसारखाच आरसीबीदेखील जेतेपदाचा दुष्काळ संपविण्यास उत्सुक असेल.
केकेआर संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. पण यूएईत त्यांनी केलेली सर्वोत्तम कामगिरी ही जमेची बाब ठरावी. या संघात आक्रमक फलंदाज आहेत, शिवाय गोलंदाजी, त्यातही फिरकी मारा भेदक आहे. सध्या केकेआर कुणालाही पराभूत करण्यास सक्षम वाटतो. तरीही अंदाज बांधणे सोपे नाही, कारण टी-२० प्रकारात नेहमी म्हटले जाते की ‘कुछ भी हो सकता है!’