athiya shetty and kl rahul : भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे, तिथे तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवली जात आहे. यष्टीरक्षक फलंदाज लोकेश राहुलचे टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. अशातच राहुल आणि त्याची पत्नी अभिनेत्री अथिया शेट्टी यांनी अनाथ मुलांसाठी पुढाकार घेत एका फाउंडेशनच्या मदतीने त्यांना मदतीचा हात म्हणून कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. या जोडप्याने विपला फाउंडेशनच्या माध्यमातून रक्कम गोळा करण्यासाठी बड्या क्रिकेटपटूंची मदत घेतली. या उपक्रमाचे नाव 'क्रिकेट फॉर ए कॉज' असे ठेवण्यात आले आहे. यामाध्यमातून राहुल आणि अथियाने एका खास लिलावाचे आयोजन केले आहे.
अनेक नामांकित खेळाडू या अनोख्या लिलावात त्यांच्या आवडीच्या वस्तू दान करतील. अथिया आणि राहुलने या उपक्रमासाठी राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, आर अश्विन, श्रेयस अय्यर, युझवेंद्र चहल, रोहित शर्मा, लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, आणि लखनौ सुपर जायंट्सचे खेळाडू जोस बटलर, क्विंटन डीकॉक, मार्कस स्टॉयनिस आणि निकोलस पूरन या नावांची माहिती दिली आहे. २३ ऑगस्ट रोजी लिलाव प्रक्रिया पार पडेल.
अथिया शेट्टीने सांगितले की, विपला फाउंडेशन हा माझ्या लहानपणीचा एक महत्त्वाचा घटक आहे. मी शालेय शिक्षणानंतर अनेक दिवस मुलांना शिकवण्यासाठी आणि त्यांच्याशी खेळण्यासाठी वेळ घालवला. या लिलावाच्या माध्यमातून मी माझ्या आजीचा वारसा जपण्याचा प्रयत्न करत आहे. तिने ऐकण्यास असमर्थ आणि दिव्यांग असलेल्या मुलांसाठी मदत करता यावी या हेतूने विपला फाउंडेशनची सुरुवात केली होती.
राहुलने सांगितले की, माझ्या शालेय जीवनातील सुरुवातीचा काळ मला भावुक करणारा होता. लहानग्यांनी मला या महान उपक्रमात योगदान देण्यासाठी प्रेरित केले, ज्यामध्ये अथियाच्या कुटुंबीयांचाही सहभाग आहे. जेव्हा मी क्रिकेटपटूंशी या कार्यासाठी संपर्क साधला तेव्हा त्यांनी त्यांच्या महागड्या क्रिकेट वस्तू दान करण्यास तितकेच सहकार्य केले. लिलावात सहभागी होऊन आणि बोली लावणारा प्रत्येकजण या मुलांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी मोलाची भूमिका बजावणार आहे.