नवी दिल्ली : कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यानं अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलवर टीका होत आहे. त्याला भारताच्या कसोटी संघात बरीच संधी मिळाली, परंतु मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला आहे. नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत राहुलला 4 डावांत 101 धावा करता आल्या. त्यामुळे आगामी कसोटी मालिकांसाठी निवड समितीने सलामीसाठी राहुला पर्याय म्हणून शोध मोहिम हाती घेतली आहे.
भारतीय संघाचे निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी राहुलला पर्याय म्हणून आता कसोटीत रोहित शर्मा सलामीला खेळणार असल्याची घोषणा केली. राहुलला मागील 12 डावांत एकच अर्धशतक झळकावता आहे. विंडीज दौऱ्यासाठीच्या कसोटी संघात रोहितचा समावेश होता, परंतु त्याला अंतिम 11 मध्ये स्थान देण्यात आले नाही. पण, आता रोहितचा कसोटीतही सलामीवीर म्हणून विचार सुरु झाला आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि माजी कसोटीपटू व्ही. व्ही. एस लक्ष्मण यांनीही रोहितसाठी बॅटींग केली आहे.
एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीती प्रसाद यांनी सांगितले की,''वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर निवड समिती सदस्यांची अद्याप बैठक झालेली नाही. पण, जेव्हा ती होईल, त्यावेळी रोहितचा कसोटीतही सलामीवीर म्हणून विचार केला जावा, या विषयावर चर्चा नक्की केली जाईल. राहुलकडे प्रतीभा आहे, परंतु सध्या तो चांगल्या फॉर्मात नाही. त्याच्या फॉर्माची आम्हालाही तितकीच चिंता आहे. त्याला लवकरच फॉर्म परत मिळवावा लागेल.''
प्रसाद यांच्या सूचक विधानानंतर आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहित सलमीला मैदानावर उतरू शकतो. रोहितनं आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये मधल्या फळीची जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याला कसोटी ओपनर म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. हनुमा विहारीनं मधल्या फळीत स्वतःला सिद्ध केले आहे. उपकर्णधार अजिंक्य रहाणेलाही सूर गवसला आहे.
आफ्रिकेच्या जलद माऱ्याचा सामना करण्यासाठी टीम इंडियाला सक्षम सलामीवीर आवश्यक आहे. मयांक अग्रवालला साजेशी कामगिरी करता आली आहे, परंतु तोही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे रोहितचे पारडे जड मानले जात आहे. रोहितनं 27 कसोटी सामन्यांत 1585 धावा केल्या आहेत. त्यात 3 शतकं आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. आफ्रिकेचा संघ तीन ट्वेंटी-20 आणि तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. 15 सप्टेंबरपासून ट्वेंटी-20 सामन्यांन या दौऱ्याची सुरुवात होणार आहे.