भारतीय संघानं ICC T20 विश्वचषक-2022 मध्ये शानदार सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला. पण या सामन्यात टीम इंडियाची चांगली सुरुवात झाली नाही. कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात परतला आणि केएल राहुलही फार काळ टिकू शकला नाही. आता भारताला पुढचा सामना नेदरलँड्सविरुद्ध सिडनीमध्ये खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी संघाच्या कोचिंग स्टाफने केएल राहुलसोबत त्याच्या फलंदाजीवर काम केले आणि त्याच्याकडून खास सराव करुन घेतला.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय संघाच्या प्रशिक्षक सदस्यांनी नेट्समध्ये लोकेश राहुलकडून वेगवान गोलंदाजी विरुद्ध खेळताना फूटवर्कच्या कमतरतेवर काम करुन घेतलं. केएल राहुलनं फूटवर्कवर काम करावं असा कोचिंग स्टाफचा आग्रह यावेळी दिसून आला. तर अष्टपैलू हार्दिक पंड्याला यावेळी सराव सत्रात आराम देण्यात आला होता.
पंड्याला मिळू शकते विश्रांतीभारतीय संघाला गुरुवारी नेदरलँड विरुद्ध सामना खेळायचा आहे, त्यामुळे संघाला हवं असल्यास स्पर्धेतील महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी या सामन्यात पंड्याला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी दीपक हुड्डा याला संधी मिळण्याची शक्यता आहे. हुड्डा संघात कोणत्याही स्थानावर फलंदाजीकरू शकतो तसंच तो ऑफ-स्पिन गोलंदाजी देखील करू शकतो. नेट सत्रात रविचंद्रन अश्विन वगळता पाकिस्तानविरुद्ध खेळणाऱ्या सर्व गोलंदाजांना विश्रांती देण्यात आली होती.
सुमारे १४० किमी प्रतितास वेगाने चार षटकं टाकल्यानंतर पंड्यानं पाकिस्तानविरुद्ध बराच वेळ फलंदाजीही केली. ऑस्ट्रेलियातील मैदानं खूप मोठी आहेत, त्यामुळे फलंदाजांना धावा काढाव्या लागत आहेत. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात पंड्या स्नायूंच्या ताणानेही त्रासलेला पाहायला मिळाला होता. रोमहर्षक सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला असला तरी विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, दीपक हुडा यांनी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर दोन तासांच्या नेट सेशनमध्ये प्रचंड घाम गाळला.
राहुलकडून करुन घेतला खास सरावराहुलबाबतची सर्वात मोठी तक्रार म्हणजे तो मोठ्या सामन्यांमध्ये संघासाठी योगदान देऊ शकलेला नाही. पाकिस्तानविरुद्धच्या गेल्या चारपैकी तीन सामन्यांत तो धावा करण्यात अपयशी ठरला. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेदरम्यान उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला राहुल या सामन्यात दडपणाखाली दिसला. नेट्समध्ये राहुलने ऑफ स्टंपबाहेरील चेंडूंवर सराव केला. राहुलच्या फलंदाजीच्या सरावादरम्यान, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि हर्षल पटेल यांना सतत ऑफ-स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करण्यास सांगितलं जात होतं.