KL Rahul IND vs SA ODIs: भारतीय संघाल वन डे मालिकेत दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. यजमानांनी ३-० ने भारताला पराभूत केले. या मालिकेआधी रोहित शर्माला संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. पण दुखापतीतून न सावरल्याने रोहितने या मालिकेतून माघार घेतली. त्यानंतर केएल राहुलकडे संघाच्या नेतृत्वाचा भार सोपवण्यात आला. टीम इंडियाला आफ्रिकेकडून लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे केएल राहुलवर लोकांनी टीकेचा भडीमार केला. पण या टीकांना राहुलने खणखणीत उत्तर दिलं.
"संघाचं कर्णधारपद भूषवताना फलंदाजी काहीशी खराब झाली असली तरी मी ते कारण देणार नाही. संघाला विजय मिळाला नाही याची वेगवेगळी कारणं आहेत. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की सध्याच्या संघात नव्या जुन्या खेळाडूंचे मिश्रण आहे. त्यामुळे आमचा संघ हा विकसनशील संघ आहे. संघाचं कर्णधारपद भूषवताना मी खूप काही शिकलो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यशापेक्षा अपयशच तुम्हाला कारकिर्दीच्या सुरूवातीला अधिक कणखर आणि सामर्थ्यवान बनवतं", असं खणखणीत उत्तर त्याने मुलाखती दरम्यान दिलं.
"मला माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत काहीही सहज आणि पटकन मिळालेलं नाही. पण मला माझ्या नेतृत्वकौशल्यावर पूर्ण विश्वास आहे. मी नक्कीच चांगली कामगिरी करू शकतो आणि माझ्या संघातील खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेऊ शकतो. मी माझ्या संघासाठी आणि माझ्या देशासाठी सर्वोत्तम कामगिरी नक्कीच करेन", असा विश्वास यावेळी राहुलने व्यक्त केला.
"टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करणं आणि कर्णधारपद भूषवणं हे माझं स्वप्न होतं. हे स्वप्न सत्यात उतरलं आणि मला त्याचा अभिमान आहे. मालिकेचा निकाल भारताच्या बाजून लागू शकला नाही याचं दु:ख आहे पण या मालिकेतून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. सध्याच्या घडीला आम्ही वर्ल्ड कपच्या दृष्टीने तयारी करत आहोत. गेल्या चार-पाच वर्षात भारतीय संघाने क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली आहे. पण आता संघाला वन डे आणि टी२० क्रिकेटमध्ये अधिक मेहनत घेणं गरजेचं आहे", असं सूचक विधान राहुलने केलं.