इंडियन प्रीमिअर लीग (IPL) च्या आगामी २०२५ च्या हंगामा आधी मेगा लिलाव होणार आहे. त्याआधी स्पर्धेतील सहभागी फ्रँचायझी संघ आपल्या स्टार क्रिकेटर्संना कायम ठेवण्याचा निर्णय घेतील. यासाठी बीसीसीआयने फ्रँचायझी संघाने ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. कोणता संघ कोणत्या खेळाडूला आपल्यासोबत कायम ठेवणार यासंदर्भातील चित्र ३१ ऑक्टोबरला संध्याकाळी अगदी स्पष्ट होईल. त्याआधी लोकेश राहुल मेगा लिलावात दिसणार हे स्पष्ट झाले आहे.
LSG कडून ऑफर मिळाली, पण KL राहुलनं दिला नकार
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, केएल राहुलनं लखनऊ सुपर जाएंट्स संघ सोडण्याचा निर्णय पक्का केला आहे. सूत्रांच्या हवाले देण्यात आलेल्या वृत्तानुसार, पर्सनल आणि प्रोफेशनल कारणास्तव त्याने या संघापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. लखनऊच्या संघाने त्याला रिटेंशन स्पॉटची ऑफर दिली होती. पण ती ऑफर त्याने नाकारलीये. याचा अर्थ त्याने मेगा लिलावात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. केएल राहुल २०२२ पासून LSG संघासोबत होता. त्याच्या कॅप्टन्सीत या संघाने दोन वेळा प्ले ऑफही खेळली होती.
१७ कोटीसह LSG नं त्याच्यावर दाखवला होता विश्वास
लखनऊ सुपर जाएंट्स संघाने केएल राहुलसाठी १७ कोटी एवढी मोठी रक्कम मोजत आपल्या ताफ्यात घेतले होते. रिटेंशन स्पॉट ऑफर केल्यावरही त्याने संघासोबत न राहण्याचा निर्णय का घेतला? या प्रश्नाचे नेमकं उत्तर तसं गुलदस्त्यातच आहे. कॅप्टन्सीचा मान मिळणार नसल्यामुळेही त्याने हा निर्णय घेतला की, LSG संघ मालक संजीव गोएंका यांच्यासोबत भर मैदानात झालेला वाद या सर्वाला कारणीभूत आहे, हा देखील एक चर्चेचा विषय आहे. आता मेगा लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसह गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्सही लोकेश राहुलवर नजरा ठेवून असतील.
KL राहुलची आयपीएलमधील कामगिरी
केएल राहुल आयपीएलमध्ये वेगवेगळ्या फ्रँचायझी संघाकडून खेळताना दिसले आहे. आतापर्यंत १३२ सामन्यात त्याने ४५.४७ च्या सरासरीनं एकूण ४६८३ धावाकेल्या आहेत. यात ४ शतकांचाही समावेश आहे. त्याने आयपीएलमध्ये १३४.६१ च्या स्ट्राइक रेटनं धावा काढल्या आहेत. लोकेश राहुल धावा करतो, पण स्ट्राइक रेट हा मुद्दा त्याच्यासाठी चिंतेचा विषय राहिला आहे. या मुद्द्याकडे कानाडोळा करून कोणता फ्रँचायझी संघ त्याच्यावर डाव लावणार ते पाहण्याजोगे असेल.