KL Rahul, IPL 2023: केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनौ सुपर जायंट्सनेराजस्थान रॉयल्सचा त्यांच्या घरच्या मैदानावर 10 धावांनी पराभव केला. राहुलच्या नेतृत्वाखाली लखनौने हाय व्होल्टेज सामना जिंकला. मात्र, त्यानंतर केविन पीटरसनने राहुलबाबत केलेल्या एका वक्तव्यावरुन गदारोळ निर्माण झाला आहे. माजी इंग्लिश क्रिकेटर पीटरसनने राहुलला सर्वात कंटाळवाणा फलंदाज म्हटले आहे. पॉवरप्लेमध्ये राहुल हा सर्वात कंटाळवाणा फलंदाज असल्याचे पीटरसनचे म्हणणे आहे.
राजस्थानविरुद्ध राहुलने 32 चेंडूत 39 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 121.88 होता. यावेळी राहुलने 4 चौकार आणि 1 षटकार मारला. मात्र, लखनौच्या कर्णधाराने सुरुवात अतिशय संथ केली. त्याने ट्रेंट बोल्टची पहिली ओव्हर मेडन खेळून काढली. राहुलची संथ फलंदाजी पाहून पीटरसनने त्याला खडे बोल सुनावले. पीटरसन म्हणाला की, पॉवरप्लेमध्ये राहुलला फलंदाजी करताना पाहणे ही आतापर्यंतची सर्वात कंटाळवाणी गोष्ट आहे.
पॉवरप्लेमध्ये राहुलची कामगिरी
केएल राहुलबद्दल बोलायचे झाले तर तो गेल्या काही काळापासून त्याच्या खराब फॉर्ममुळे चर्चेत आहे. त्याच्या स्ट्राईक रेटवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. खराब फॉर्ममुळे टीम इंडियाचे उपकर्णधारपदही त्याच्याकडून काढून घेण्यात आले. मात्र, आयपीएलच्या या मोसमात तो आपल्या संघाला विजयाकडे नेत आहे. केएल राहुलबद्दल बोलायचे तर, गेल्या वर्षी टी-20 पॉवरप्लेमध्ये त्याने 30 डावात 104 च्या स्ट्राइक रेटने 400 चेंडूत 416 धावा केल्या होत्या आणि या वर्षी त्याने 6 डावात 87 चेंडूत 95 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 109.19 आहे.
लखनौ 8 गुणांसह दुसऱ्या स्थानी
गुणतालिकेत लखनौ 8 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. टेबल टॉपर राजस्थान रॉयल्सच्या बरोबरीचे आहे. राजस्थानचा नेट रनरेट लखनौच्या तुलनेत खूपच चांगला आहे. राहुलच्या संघाने 6 पैकी 4 सामने जिंकले आणि 2 गमावले. त्याच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर त्याने राजस्थानविरुद्ध 39 धावा केल्या होत्या. याआधी त्याने पंजाब किंग्जविरुद्ध ७४ धावांची खेळी खेळली होती.