IND vs ENG : हैदराबाद कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघाला दोन मोठे धक्के बसले.. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि लोकेश राहुल यांनी २ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीतून माघार घेतली. पण, जडेजाची दुखापत ही गंभीर असल्याचे वृत्त समोर येत आहे आणि तो संपूर्ण मालिकेला मुकण्याची चिन्हे आहेत. लोकेश राहुल तिसऱ्या कसोटीसाठी संघात परणार आहे.
“राहुल कदाचित या मालिकेत नंतर पुनरागमन करू शकेल, परंतु जडेजाची दुखापत अधिक गंभीर असू शकते. NCA वैद्यकीय टीम आम्हाला काय सांगते ते पाहूया,” असे बीसीसीआयच्या एका सूत्राने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले.
हैदराबादमधील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी जलद धावण्याचा प्रयत्न करताना जडेजाला दुखापत झाली. या अष्टपैलू खेळाडूला उर्वरित मालिकेसाठी वगळण्यात आले, तर विराट कोहली आणि मोहम्मद शमी यांच्यानंतर टीम इंडियासाठी हा मोठा धक्का असू शकतो. सिलेक्टर्सनी दुसऱ्या कसोटीत जडेजाच्या जागी अनकॅप्ड खेळाडू सौरभ कुमार आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर यांना संघात निवड केली आहे. रवींद्र जडेजा बाहेर पडल्यास उर्वरित सामन्यांमध्ये ही जोडी टिकून राहण्याची शक्यता आहे. सर्फराज खान याचीही संघात निवड झाली आहे.
इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा बदललेला संघ: रोहित शर्मा (क), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (य), ध्रुव जुरेल (य), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपक), आवेश खान, रजत पाटीदार, सर्फराज खान, वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार.