इंडियन प्रीमिअर लीग २०२४मध्ये सनरायझर्स हैदराबादने बुधवारी फक्त लखनौ सुपर जायंट्सचा मानहानीकारक पराभवच केला नाही, तर फ्रँचायझीचा कठोर निर्णय घेण्यासही भाग पाडले आहे. LSG चे १६६ धावांचे लक्ष्य SRH च्या दोन फलंदाजांनी अवघ्या ९.४ षटकांत पार केले आणि गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. आयपीएल इतिहासात प्रथमच एखाद्या संघाने १५० हून अधिक धावांचे लक्ष्य १० षटकाच्या आत पार केले. त्यामुळेच लनखौ सुपर जायंट्सच्या फ्रँचायझी मालक संजीव गोएंका यांचा पारा चढला आणि सामन्यानंतर ते कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) याला झापताना दिसले. पण, हे प्रकरण इथेच थांबलेलं नाही, फ्रँचायझीने कर्णधाराच्या हकालपट्टीच्या हालचाली सुरू केल्याचे वृत्त समोर येत आहे.
KL Rahul ला झापणाऱ्या संजीव गोएंका यांनी MS Dhoni लाही अचानक कर्णधारपदावरून हटवले होते...
निकोलस पूरन ( ४८) व आयुष बदोनी ( ५५) यांनी पाचव्या विकेटसाठी ५२ चेंडूंत ९९ धावा जोडून लखनौला ४ बाद १६५ धावांपर्यंत पोहोचवले. SRH ने ९.४ षटकांत बिनबाद १६७ धावा करून दणदणीत विजय मिळवला. अभिषेक शर्माने २८ चेंडूंत ८ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ७५ धावा केल्या, तर ट्रॅव्हिस हेडने ३० चेंडूंत ८ चौकार व ८ षटकारांसह नाबाद ८९ धावा कुटल्या. या सामन्यानंतर गोएंका संतापलेले दिसले आणि त्यांनी कोच जस्टीन लँगर व कर्णधार लोकेश राहुल यांच्यावर राग काढला. २०२२ मध्ये लिलावापूर्वी विक्रमी १७ कोटी रुपयांमध्ये निवडण्यात आलेल्या एलएसजी कर्णधाराला २०२५ मधील मेगा लिलावापूर्वी रिलीज करणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. तसेच लीगच्या शेवटच्या दोन साखळी सामन्यापूर्वीच लोकेश राहुल कर्णधारपदही सोडणार असल्याचे वृत्त आहे.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पुढील सामन्यासाठी पाच दिवसांचे अंतर आहे. अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, परंतु असे समजते की राहुलने उर्वरित दोन सामन्यांसाठी फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याचा विचार केला तर व्यवस्थापनाला हरकत नाही. आयपीएलच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले. KL Rahul ने आयपीएलच्या या पर्वात १२ सामन्यांत ४६० धावा केल्या आहेत आणि ऑरेंज कॅपच्य शर्यतीत तो सहाव्या क्रमांकावर आहे.