मुंबई: टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी अतिशय खराब झाली आहे. पाकिस्तान, न्यूझीलंडविरुद्ध दारुण पराभव पत्करावा लागल्यानं टीम इंडियाच्या उपांत्य फेरीच्या आशा मावळल्या आहेत. भारतीय संघाला गट साखळीतच गाशा गुंडाळावा लागण्याची शक्यता आहे. आयपीएल पाठोपाठ विश्वचषक स्पर्धा खेळल्याचा परिणाम दिसू लागला आहे. त्यामुळे बीसीसीआयनं न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्त्व के. एल. राहुलकडे दिलं जाऊ शकतं.
बीसीसीआयमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेतृत्त्वासाठी सर्वाधिक पसंती राहुलला आहे. 'वरिष्ठ खेळाडूंना विश्रांतीची गरज आहे. के. एल. राहुल संघाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यामुळे तोच संघाचं नेतृत्त्व करेल हा निर्णय जवळपास निश्चित आहे,' अशी माहिती त्यांनी दिली. या मालिकेत प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळेल. मात्र त्यांना कोविड-१९ प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करावं लागेल.जसप्रीतनं उपस्थित केला होता विश्रांतीचा मुद्दाटी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताला पाकिस्तान, न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर जसप्रीत बुमराहनं खेळाडूंच्या विश्रांतीचा मुद्दा उपस्थित केला. 'अनेकदा तुम्हाला विश्रांतीची गरज असते. तुम्ही सलग ६ महिन्यांपासून खेळत आहात. या सगळ्या गोष्टी तुमच्या मनात सुरू असतात. पण मैदानात असताना तुम्ही या गोष्टींचा विचार करत नाही. अनेक गोष्टींवर तुमचं नियंत्रण नसतं. वेळापत्रक कसं असेल, कधी कोणती स्पर्धा खेळायची असते, अशा गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या पलीकडे असतात', असं बुमराह म्हणाला.भारत वि. न्यूझीलंड मालिका १७ नोव्हेंबरपासूनटी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर न्यूझीलंडचा संघ भारतात येईल. भारत वि. न्यूझीलंड यांच्यामध्ये टी-२० मालिका होईल. या मालिकेला १७ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. १७, १९ आणि २१ नोव्हेंबरला सामने होतील. जयपूर, रांची आणि कोलकात्यात हे सामने खेळवले जातील. त्यानंतर २५ नोव्हेंबरला कानपूरमध्ये पहिला कसोटी सामना रंगेल. ३ ते ७ डिसेंबर दरम्यान मुंबईत दुसरी कसोटी होईल.