आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर आता आयपीएलच्या आगामी हंगामाची चर्चा रंगू लागली आहे. जे खेळाडू दुबईच्या मैदानात एक संघ होऊन खेळताना दिसले ते आता आपापल्या फ्रँचायझी संघाकडून एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरतील. टीम इंडियातील काही खेळाडू एकाच फ्रँचायझीचा भाग आहेत. त्यातही एका संघात असलेल्या दोघांच्यात कॅप्टन्सीसाठी स्पर्धा सुरु आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अक्षर पटेलची दावेदारी झाली भक्कम, पण..
आयपीएलमधील १० पैकी ९ संघांनी आपले कॅप्टन निवडले आहेत. पण अद्याप दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व कोण करणार? ते गुलदस्त्यातच आहे. या शर्यतीत चॅम्पियन्स ट्रॉफीत चमकलेले दोन हिरोंमध्ये तगडी फाइट आहे. लोकेश राहुल आणि अक्षर पटेल या दोघांतील एकाच्या खांद्यावर दिल्ली कॅपिटल्स संघाच्या कॅप्टन्सीची जबाबदारी पडू शकते, अशी चर्चा रंगताना दिसते. त्यात आता केएल राहुलनं कॅप्टन्सीची ऑफर नाकारल्यामुळे अक्षर पटेलचा दावा अधिक भक्कम होताना दिसतोय. इथं नजर टाकुयात त्याच्यावर कॅप्टन्सीचा डाव खेळण्याचा निर्णय चुकीचा ठरवण्यामागंची ३ कारणं
कॅप्टन्सीच्या अनुभावची कमी
अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत येण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे तो टीम इंडियाच्या टी-२० संघाचा उप कर्णधार झालाय. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने गुजरात संघाची कॅप्टन्सी केलीय. पण आयपीएलमध्ये त्याला नेतृत्वाचा अनुभव नाही. त्यामुळेच दिल्ली कॅपिटल्स संघाच्या कॅप्टन्सीचा तो सर्वोत्तम पर्याय ठरू शकत नाही.
संघात कॅप्टन्सीचे तगडे पर्याय
अक्षर पटेल कॅप्टन्सीच्या शर्यतीत असला तरी त्याला टक्कर देणाऱ्या खेळाडूंच्या रुपात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडे त्याच्यापेक्षा उत्तम पर्याय आहेत. लोकेश राहुलनं ऑफर नाकरल्याची चर्चा रंगत असली तरी या अनुभवी खेळाडूशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या फाफ ड्युप्लेसिसच्या रुपात ताफ्यात अनुभवी कर्णधार आहे. तो पर्याय सोडून अक्षरची निवड ही एक मोठी रिस्कच आहे.
कामगिरीवर परिणाम होण्याचा धोका
सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा की, अक्षर पटेल हा मॅच विनर खेळाडू आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत त्याने आपली धमक दाखवून दिलीये. अष्टपैलू खेळीच्या जोरावर सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. पण नेतृत्वाची माळ गळ्यात पडल्यावर त्याच्या कामगिरीवर परिणाम झाला तर हा डाव दिल्ली कॅपिटल्ससाठी चांगलाच महागात पडू शकतो.