KL Rahul on Virat Kohli : लोकेश राहुल ( KL Rahul) उद्या प्रथमच टीम इंडियाच्या वन डे संघाचे नेतृत्व करणार आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली माजी कर्णधार विराट कोहली खेळताना दिसणार आहे. भारत-दक्षिण आफ्रिका ( India vs South Africa) यांच्यातली वन डे सामन्यांची मालिका बुधवारपासून सुरू होत आहे. पहिल्या लढतीपूर्वी लोकेश पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे गेला. यावेळी त्यानं विराटच्या नेतृत्वाचे भरभरून कौतुक केले. विराटनं भारतीय संघात एक विश्वास निर्माण केला आणि तो म्हणजे आपण भारताबाहेरही कोणत्याही प्रतिस्पर्धीला पराभूत करू शकतो. विराटनं मागच्या वर्षी ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडलं आणि त्यानंतर बीसीसीआयनं त्याच्याकडून वन डे संघाचे कर्णधारपद काढून घेतले. मागील आठवड्यात विराटनं कसोटीचेही नेतृत्व सोडलं.
विराटच्या नेतृत्वाखाली राहुल बरेच क्रिकेट खेळला आहे. ३३ वर्षीय राहुल म्हणाला,''विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं अविश्वसनीय कामगिरी केली आहे. आम्ही भारताबाहेर मालिका जिंकल्या, याआधी हे कधी झालं नव्हतं. आम्ही प्रत्येक देशात गेलो आणि तिथे मालिका जिंकली. त्यानं बऱ्याच योग्य गोष्टी केल्या आणि त्यानं आमच्यासाठी व टीम इंडियासमोर एक प्रमाण सेट केलं आहे. आता त्याहून चांगली कामगिरी करण्याचं आव्हान आमच्यासमोर आहे. विराटनं सुरू केलेला यशाचा मार्ग आम्ही पुढे चालू ठेवणार आहे.''
विराटला प्रत्येक खेळाडूकडून सर्वोत्तम कामगिरी करून घ्यायचा आणि लिडर म्हणून तोही खेळाडूंसमोर एक आदर्श ठेवायचा. २९ वर्षीय राहुल म्हणाला,''जेव्हा नेतृत्वगुणाचा विचार केल्यास विराटकडे प्रत्येक खेळाडूकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याची क्षमता होती. तो सतत प्रोत्साहन द्यायचा आणि त्यानं आपणही काही खास करू शकतो, हा विश्वास त्यानं निर्माण केला. त्याच्याकडून मी हे शिकलो आहे आणि आशा करतो की मी तसंच संघासोबत करण्यात यशस्वी होईन.''
''कसोटी क्रिकेटप्रती विराट कोहलीची तीव्रता साऱ्या जगाला माहित्येय. तो पुढे राहुन संघाचे नेतृत्व करायचा. त्यानं संघात बरेच बदल केले आणि सध्याच्या संघात जी विजयाची भूक आहे, ती विराटमुळे आहे. भारताबाहेर कोणत्याची संघाला आपण हरवू शकतो, हा विश्वास त्यानं आम्हा सर्वांत निर्माण केला. मलाही तेच करायचे आहे,''असे राहुल म्हणाला.