Asia Cup 2023 - आशिया चषक २०२३ स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द करावा लागला. पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर भारतीय संघाची आघाडीची फळी कोलमडून पडली. इशान किशन व हार्दिक पांड्या यांच्या १३८ धावांच्या भागीदारीमुळे टीम इंडियाची लाज वाचली. रविवारी नेपाळविरुद्धही याच प्लेइंग इलेव्हनसह भारतीय संघ मैदानावर उतरणार आहे. या लढतीपूर्वी भारतासाठी आनंदाची बातमी आली आहे. KL Rahul ने फिटनेस टेस्ट पास केली आहे आणि तो आशिया चषक स्पर्धेसाठी श्रीलंकेला लवकरच रवाना होणार आहे. त्यामुळे भारताची मधली फळी मजबूत होणार आहे, परंतु त्याच्यासाठी प्लेइंग इलेव्हनमधून कोणाला बाहेर करावं, हा कर्णधार रोहित शर्मासमोर प्रश्न पडलाय.
लोकेश राहुल दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर आहे. त्याने आणि श्रेयस अय्यर यांनी NCA मध्ये फिटनेससाठी प्रचंड मेहनत घेतली. श्रेयसने १०० टक्के तंदुरुस्ती दाखवून आशिया चषक स्पर्धेतील पहिली मॅच खेळलीही. आशिया चषकाचा संघ जाहीर करताना निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी लोकेश सुरुवातीचे दोन सामने खेळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले होते. त्यामुळे बॅक अप म्हणून संजू सॅमसनची निवड केली गेली. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही KL च्या २ सामने मुकण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. पण, आता तो सुपर ४ च्या लढतीसाठी संघात परणार आहे.
राहुलला NCA च्या वैद्यकीय टीमकडून फिटनेस सर्टिफिकेट मिळाला आहे आणि त्याने नेट्समध्ये चांगला सराव केला आहे. राहुलकडे फलंदाजी व्यतिरिक्त यष्टिरक्षकाची जबाबदारीही आहे. त्यामुळे त्याला खेळवण्याची घाई संघ व्यवस्थापन करू इच्छित नाही. राहुल वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतही भारतीय संघात दिसणार आहे आणि आता आशिया चषकातील सामने त्याच्यासाठी महत्त्वाचे आहेत. राहुलच्या येण्याने सुपर ४ च्या लढतीत श्रेयस अय्यर किंवा इशान किशन यांच्यापैकी एकाला बाहेर बसावे लागणार आहे. अय्यरला पाकिस्तानविरुद्ध १४ धावाच करता आल्या, तर इशानने ८२ धावांची खेळी करून भारताचा डाव सावरला होता.