KL Rahul Team India: भारताचा स्टार फलंदाज आणि दमदार सलामीवीर लोकेश राहुल याला कोरोनाची लागण झाल्याने टीम इंडियाला विंडिज दौऱ्याआधी मोठा धक्का बसला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( BCCI ) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या संदर्भातील माहिती दिली होती. विंडिज दौऱ्यातील टी२० मालिकेला कालपासून सुरूवात झाली. या मालिकेसाठी राहुलचा संघात समावेश होता. पण तो कोविडमधून अद्याप सावरला नसल्याने त्याच्या जागी संजू सॅमसनला संघात सामील करून घेण्यात आले. झिम्बाब्वे दौऱ्यावरही त्याची निवड करण्यात आली नाही. त्यानंतर आज केएल राहुलने भारतीय क्रिकेट टीमच्या चाहत्यांसाठी एक अतिशय भावनिक ट्वीट संदेश दिला.
"माझ्या आरोग्याविषयी आणि फिटनेसविषयी काही गोष्टींचे स्पष्टीकरण द्यायचे आहे. स्पष्टच सांगायचं तर जून महिन्यात माझ्यावर शस्त्रक्रिया झाली आणी ती शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. वेस्ट इंडिज दौऱ्यावर खेळायचे जायचे या आशेने मी क्रिकेटचा सरावदेखील सुरू केला होता. पण विंडिज दौऱ्यावर जाण्याआधी मला कोरोनाची बाधा झाली. माझा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे मला आणखी काही आठवड्यांची सक्तीची विश्रांती घेणं भाग पडले. पण आता लवकरात लवकर तंदुरूस्त होणं आणि संघात पुनरागमन करणं हे माझं लक्ष्य आहे. भारतीय संघातून खेळणं हा सर्वोच्च सन्मान असतो. मी पुन्हा एकदा भारताच्या जर्सीमध्ये मैदानात उतरण्यासाठी आतुर झालो आहे. लवकरच भेटूया", अशा आशयाचा संदेश देणारं ट्वीट केएल राहुलने केलं.
झिम्बाव्बे दौऱ्यासाठी फिट नसल्याचे राहुलचा संघात समावेश नसल्याचे त्याने स्पष्ट केले. दरम्यान आज या दौऱ्यासाठी संघाची घोषणा करण्यात आली. झिम्बाब्वे विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ पुढीलप्रमाणे-
भारतीय संघ: शिखर धवन (कर्णधार) ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, अवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर