India vs South Africa T20I Series: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली ट्वेंटी-२० मालिका ९ जून पासून सुरू होत आहे आणि त्यासाठी लोकेश राहुलच्या ( KL Rahul) नेतृत्वाखाली BCCI ने १८ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघात रोहित शर्मा, विराट कोहली व जसप्रीत बुमराह या सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे, तर दिनेश कार्तिक व हार्दिक पांड्या यांचे पुनरागमन झाले आहे. अर्षदीप सिंग व उम्रान मलिका यांच्या कामगिरीची दखल घेत यांनाही पदार्पणाची संधी दिली आहे. पण, बीसीसीआयने या मालिकेआधी एक नवीन नियम आणला आहे आणि त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये खेळणाऱ्या या स्टार खेळाडूंचे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळण्याची अनिश्चितता वाढली आहे.
मागील दोन महिने हे सर्व खेळाडू आयपीएल २०२२मध्ये खेळत आहेत आणि त्यापैकी काहींना दुखापतही झालेली आहे. BCCIला या सर्व गोष्टीची कल्पना आहे आणि त्यामुळेच त्यांनी नवा नियम आणला आहे. ''दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी निवडलेल्या सर्व खेळाडूंना तंदुरूस्त चाचणीसाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) दाखल व्हावे लागणार आहे. अनेकांना तुरळक दुखापत झाली आहे. त्यामुळे या कॅम्पमध्ये त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. उदाहरण द्यायचं झाल्यास, हर्षल पटेलच्या हाताला टाके लागले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मालिकेपूर्वी सर्व खेळाडू तंदुरूस्त असणे महत्त्वाचे आहे,'' असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.
५ जूनपर्यंत हे सर्व १८ खेळाडू NCA मध्ये दाखल होतील. त्यानंतर त्यांना व्ही व्ही एस लक्ष्मणच्या मार्गदर्शनाखाली तंदुरुस्ती चाचणी द्यावी लागेल. या तंदुरुस्त चाचणीवर खेळाडूंचा मालिकेतील सहभाग ठरणार आहे. ७ जूला ते पहिल्या ट्वेंटी-२०साठी दिल्लीला रवाना होतील. राहुल द्रविड या संपूर्ण मालिकेसाठी उपलब्ध असणार आहे. तो २१ जूनला इंग्लंडमध्ये दाखल होईल.
भारताचा संघ - लोकेश राहुल ( कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्षदीप सिंग, उम्रान मलिक
दक्षिण आफ्रिकेचा संध - टेम्बा वबुमा ( कर्णधार), क्विंटन डी कॉक, रिझा हेड्रीक्स, हेनरीच क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्खिया, वेन पार्नेल, ड्वेन प्रेटोरियस, कागिसो रबाडा, तब्रेज शम्सी, त्रिस्तान स्तुब्ब्स, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, मार्को येनसेन
भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचे वेळापत्रक
पहिली ट्वेंटी-२० - ९ जून, दिल्लीदुसरी ट्वेंटी-२० - १२ जून, कटकतिसरी ट्वेंटी-२० - १४ जून, विझाकचौथी ट्वेंटी-२० - १७ जून, राजकोटपाचवी ट्वेंटी-२० - १९ जून, बंगळुरू