India vs South Africa 3rd ODI Live (Marathi News) : भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ७८ धावांनी विजय मिळवून मालिका २-१ अशी जिंकली. २०१८ नंतर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत वन डे मालिका जिंकली. विराट कोहलीनंतर आफ्रिकेत वन डे मालिका जिंकणारा लोकेश हा दुसरा भारतीय कर्णधार ठरला. या मालिकेत अर्शदीप सिंग, संजू सॅमसन आणि साई सुदर्शन या युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी करून दाखवली. या सामन्यानंतर लोकेशने MS Dhoni ने सुरू केलेली परंपला कायम राखताना जेतेपदाची ट्रॉफी रिंकू सिंगच्या हाती सोपवली. त्यानंतर त्याने आणखी एक मन जिंकणारी कृती केली.
या वन डे मालिकेतून पदार्पण करणाऱ्या साई सुदर्शनने पहिल्या दोन सामन्यांत अर्धशतक झळकावले. तिसऱ्या सामन्यात त्याला मोठी खेळी साकारता आली नसली तरी त्याने क्षेत्ररक्षणात महत्त्वाचे योगदान दिले. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिच क्लासेनचा अफलातून झेल टिपला आणि त्याच्या याच योगदानाचे कौतुक म्हणून कर्णधार लोकेशने मोठ्या मनाने इम्पॅक्ट फिल्डरचा पुरस्कार त्याला दिला. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान भारतीय संघ व्यवस्थापनाने सुरू केलेली इम्पॅक्ट फिल्डर पुरस्काराची परंपरा याही दौऱ्यावर कायम दिसली.
आवेश खानच्या चेंडूवर क्लासेनचा फटका चुकला अन् मिड ऑफच्या दिशेने चेंडू गेला.. साई सुदर्शनने हवेत झेप घेत हा झेल टिपला. क्लासेनला २१ धावांवर माघारी जावे लागले. या सामन्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर पुरस्काराच्या शर्यतीत सहा झेल घेणारा लोकेश राहुल आघाडीवर होता. पण, लोकेशने हा पुरस्कार साई सुदर्शनला देण्यात यावा अशी विनंती केली. भारतीय संघाचे फिल्डिंग कोच अजय रात्रा यांनी हा पुरस्कार दिला. या मालिकेत भारताने एकूण १२ झेल घेतले. कर्णधार व यष्टिरक्षक लोकेश राहुलने ६ कॅच घेतल्या, संजू सॅमसनने २, तर साई सुदर्शनने तिसऱ्या वन डेत १ झेल टिपला.