भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा सुरू आहे. २६ डिसेबंरपासून कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेसाठी विराट कोहली कर्णधार असणार आहे. त्याच्या जोडीला निवड समितीने रोहित शर्माला उपकर्णधारपद दिले होते. पण दुखापतीमुळे रोहितने मालिकेतून माघार घेतली आणि लोकेश राहुलला हे पद सांभाळायची संधी मिळाली. लोकेश राहुलने इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करून दाखवली होती. त्यामुळेच निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास दाखवला. ही मोठी जबाबदारी घेऊन मैदानात उतरण्याआधी राहुलने आपल्या मनात असलेल्या भावना व्यक्त केल्या.
"आमचा पहिला सामना २६ डिसेंबरपासून म्हणजेच बॉक्सिंग डे ला आहे. या दिवसाच्या माझ्या मिश्र अशा प्रकारच्या आठवणी आहेत. माझी पहिली कसोटी मी बॉक्सिंग डे ला ऑस्ट्रेलियामध्ये खेळलो होतो. त्या सामन्यात मला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यावेळी मी संघातील माझी जागा गमावून बसलो होतो आणि त्याच वेळी मला वाटलं होतं की आता सारं काही संपलं", अशी आठवण राहुलने बोलून दाखवली.
"वर्षभरापूर्वी किंवा अगदी ६-७ महिन्यांपूर्वी मी कधी विचारदेखील केला नव्हता की मला पुन्हा एकदा टीम इंडियाकडून कसोटी सामना खेळण्याची संधी मिळेल. इंग्लंडच्या दौऱ्यावर इतर दोन सलामीवीर दुखपातीमुळे बाहेर झाले आणि मला संधी मिळाली. इंग्लंडच्या दौऱ्यात गोष्टी पटकन बदलल्या. आणि आता तर मला थेट संघातील मोठी जबाबदारी म्हणजेच उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. मला मिळालेल्या या संधीसाठी मी साऱ्यांचाच खूप आभारी आहे. संघाचा उपकर्णधार म्हणून या दौऱ्यावर मी नक्कीच सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन", असं राहुल म्हणाला.
"माझ्या सध्याच्या फलंदाजीचा विचार केला तर मला असं वाटतं की माझा सध्याचा खेळ हा संतुलित आहे. मी झटपट धावा करण्याच्या मागे धावत नाही आणि खूप वेळ एका जागी चिकटूनही उभा राहत नाही. मी सतत धावा काढत राहतो आणि धावफलक हालता ठेवतो. २०१४ साली मी जसा खेळायचो किंवा २०१८ ला माझ्या कसोटी पदार्पणात जसा खेळलो होतो, त्यापेक्षा आता माझ्या फलंदाजीत खूप बदल झाला आहे", असंदेखील राहुलने नमूद केले.