IPL 2022 मध्ये दोन नव्या संघांमध्ये सोमवारचा सामना रंगला. हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) च्या गुजरात टायटन्सने राहुलच्या लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केलं. मोक्याच्या क्षणी गोलंदाजीतील बदल आणि फिल्डिंग पोझिशन यांचा मेळ न घालता आल्याने राहुलचा संघ पराभूत झाला. टीम इंडियातही आतापर्यंतचा राहुलचा प्रवास चढउतारांचाच आहे. बराच वेळ संघाबाहेर राहिल्यानंतर तो संघात परतला होता. त्यानंतर त्याला उपकर्णधारपद मिळालं पण दुखापतीमुळे तो संघाबाहेर राहिला. पण सध्या मात्र राहुल आपल्या आईबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.
राहुलने गौरव कपूरच्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने आपल्या आईबद्दल एक वक्तव्य केलं. 'माझी आई २६ वर्ष माझ्याशी खोटं बोलली'; असा दावा राहुलने केला. "काही वर्षांपूर्वीच एक सत्य माझ्यासमोर आलं. त्यावेळी मला समजलं की गेली २६-२७ वर्षे माझी आई माझ्याशी खोटं बोलत होती. माझं नाव कसं ठेवलं गेलं यावरून तिने सांगितलेली गोष्ट खोटी निघाली. माझी आई शाहरूख खानची खूप मोठी फॅन आहे आणि ९०च्या दशकात शाहरूखच्या चित्रपटांमध्ये त्याचं नाव राहुल होतं त्यामुळे तुझं नाव राहुल ठेवलं असं मला आईने सांगितलं होतं", असं राहुल म्हणाला.
राहुलने पुढे सांगितलं, "माझ्या एका मित्राने मला याबद्दल एक बाब लक्षात आणून दिली. माझ्या एका मित्राला सिनेमे पाहायची खूप आवड आहे. त्याने एकदा मला सांगितलं की शाहरूखचं चित्रपटात पहिल्यांदा जेव्हा नाव राहुल होतं, तो चित्रपट १९९४ साली आला होता. तुझा जन्म तर १९९२ सालचा आहे. त्यामुळे तुझी आई जे लॉजिक सांगते आहे त्याचा अर्थ लागत नाही."
"मित्राने ही गोष्ट सांगितल्यावर मी स्वत: इंटरनेटवर नीट तपासून पाहिलं तर तो खरं सांगत होता. त्यामुळे मी याबद्दल माझ्या आईला जाऊन विचारलं. त्यावेळी ती म्हणाली की मला आता नीट आठवत नाही पण तुझ्या नावाचा संबंध चित्रपट आणि बॉलिवूड याच्याशीच आहे. आता इतक्या वर्षांनी त्यामागचं नक्की कारण आठवत नाहीये आणि आता त्याची कोणाला पर्वादेखील नाहीये", असं उत्तर आईकडून मिळाल्याचा मजेशीर किस्सा राहुलने सांगितला.