KL Rahul, Deepak Chahar Wedding: भारतीय स्टार क्रिकेटर दीपक चहर याचा बुधवारी जया भारद्वाज हिच्याशी विवाह संपन्न झाला. या लग्नात फारसे क्रिकेटपटू उपस्थित नव्हते. दीपक चहरचा भाऊ राहुल चहर आणि त्याची पत्नी इशानी मात्र लग्नासाठी हजर होते. नुकताच संपलेला IPLचा हंगाम आणि आगामी मालिकेतून मिळालेली विश्रांती यामुळे अनेक खेळाडू आपल्या कुटुंबासोबत परदेशात वेळ घालवत आहेत. त्यामुळे ते लग्नाला उपस्थित राहू शकले नाहीत. पण चाहत्यांना एका गोष्टीचं विशेष आश्चर्य वाटलं, जेव्हा लोकेश राहुल टीम इंडियाच्या दीपक चहरचे लग्न सोडून बहारिनच्या क्रिकेटपटूच्या लग्नाला उपस्थित राहिला.
कोण आहे हा दुसरा क्रिकेटपटू?
लोकेश राहुलने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये त्याने एका लग्नाला उपस्थित असल्याचे फोटो पोस्ट केले होते. पण ते लग्न दीपक चहरचं नव्हतं. राहुल हा बहारिनचा क्रिकेटपटू डेव्हिड मथियास याच्या लग्नाला गेला होता. सध्या तो बहारिनकडून क्रिकेट खेळत असला तरी डेव्हिड हा मूळचा कर्नाटकचा आहे. त्याने कल्याणी देसाई हिच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांच्याच लग्नातील फोटो पोस्ट करत राहुलने लिहिले की हे माझ्या भावाचं लग्न आहे.
दरम्यान, डेव्हिड मथियासने कर्नाटककडून सुरूवातीला पाच प्रथम श्रेणी सामने खेळले होते. तेव्हा या दोघांमधील मैत्री वाढली. त्यानंतर मथियासने बहारिनकडून चार आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याने ११९ धावा केल्या असून गोलंदाजीत अद्याप एकही विकेट घेता आलेली नाही.
भारत-आफ्रिका टी२० मालिका ९ जूनपासून
टीम इंडियाबद्दल बोलायचे झाल्यास, राहुल आणि टीम इंडियातील इतर खेळाडू ५ जूनला दिल्लीत दाखल होणार आहेत. तेथूनच टी२० सिरीजला सुरूवात होणार आहे. या मालिकेसाठी काही खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्याने राहुलकडे संघाचे कर्णधारपद असणार आहे.
भारताचा टी२० संघ- लोकेश राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (उपकर्णधार) दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.
Web Title: KL Rahul skips Team India Cricketer Deepak Chahar Wedding to attend another wedding of Bahrain cricketer david mathias see photos
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.