KL Rahul Surgery Update: 'टीम इंडिया'चा उपकर्णधार केएल राहुलचे जर्मनीमध्ये स्पोर्ट्स हर्नियाचे यशस्वी ऑपरेशन झाले. राहुलने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली. या शस्त्रक्रियेमुळे राहुल काही महिने स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर राहण्याची शक्यता आहे. राहुलला गेली अनेक वर्षे फिटनेस समस्यांचा सामना करावा लागला आहे. त्याला मांडीचा ताण आल्याने पायाच्या स्नायूंनाही दुखापत झाली होती. राहुलने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'गेले काही आठवडे खूप कठीण गेले. पण शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मी हळूहळू तंदुरूस्त होत आहे. मी लवकरच पुनरागमन करेन. तुमच्या संदेश आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद. लवकरच भेटू', असे राहुलने सांगितले. त्यामुळे राहुल नजीकच्या काळात असलेल्या एका मोठ्या स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे.
भारतात परतल्यावर, राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) च्या क्रीडा विज्ञान संघाचे प्रमुख डॉ. नितीन पटेल यांच्या नेतृत्वाखाली राहुलचे रिहॅबिलिटेशन केले जाणार आहे. राहुल नक्की किती दिवसांत क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करेल याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. पण सध्या मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी आणखी काही महिने लागू शकतात. BCCI च्या एका सूत्राने सांगितले की, "राहुल काही दिवस विश्रांती घेईल आणि त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याचे पुनर्वसन सुरू होईल." नियमित नेट्समध्ये सराव करण्यासाठी त्याला काही आठवडे लागू शकतात. त्यामुळे तो आशिया चषकाला मुकण्याची दाट शक्यता आहे.
राहुल हा टी२० फॉरमॅटमधील भारतातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी२० विश्वचषक स्पर्धेत तो महत्त्वाची भूमिका बजावेल अशी साऱ्यांची अपेक्षा आहे. ३० वर्षीय राहुलने त्याच्या आठ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारतासाठी ४२ कसोटी, ४२ वन डे आणि ५६ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.