India vs West Indies, 2nd ODI Live Updates : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात निराशाजनक सुरुवातीनंतर टीम इंडियाचा डाव सावरला. लोकेश राहुल व सूर्यकुमार यादव यांनी उल्लेखनीय कामगिरी करताना वेस्ट इंडिजला सडेतोड उत्तर दिले. लोकेशचे अर्धशतक १ धावेने हुकले असले तरी सूर्यकुमारसोबत त्याने टीम इंडियाची बाजू भक्कम केली. सूर्यकुमारने अर्धशतक झळकावताना धावांचा डोलारा उभारला. पण, ही दोघं बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा टीम इंडियाच्या तळाच्या फलंदाजांची घसरगुंडी झाली.
नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. रोहित शर्मा व रिषभ पंत सलामीला आलेला पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. पण, हा डाव फसला अन् रोहित ५ धावा करून माघारी परतला. त्यानंतर १२व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रिषभने ( १८) उत्तुंग फटका मारला, परंतु जेसन होल्डरने धाव घेत सुरेख झेल टिपला. त्यानंतर ओडीन स्मिथने पुढील चार चेंडू वेगवेगळ्या प्रकारे फेकले आणि सहाव्या चेंडूवर विराटची ( १८) विकेट घेतली. भारताच्या १२ षटकांत ३ बाद ४३ धावा झाल्या होत्या.
तेव्हा लोकेश राहुल व सूर्यकुमार यादव यांनी सावध खेळ करताना चौथ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली. ही जोडी चांगली जमलीय असे वाटत असताना लोकेशने घाई केली. अर्धशतकासाठी दोन धावांची गरज असताना तो दुसऱ्या धावेसाठी धावला अन् रन आऊट झाला. त्याने ४८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४९ धावा केल्या. सूर्यकुमारने नंतर चांगली फटकेबाजी करताना वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. पण, ३९व्या षटकात फॅबियन अॅलेनच्या गोलंदाजीवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. सूर्यकुमारने ८३ चेंडूंत ५ चौकारांसह ६४ धावा केल्या. सूर्याने ६व्या विकेटसाठी वॉशिंग्टन सुंदरसह ४३ धावा जोडल्या.