नवी दिल्ली :भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला. माजी कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि जसप्रीत बुमराह अशा अनेक प्रमुख खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे. मात्र, त्याचवेळी आघाडीच्या फळीतील प्रमुख फलंदाज लोकेश राहुल मात्र जर्मनीला रवाना होणार असल्याची माहिती मिळाली. दुखापतीतून सावरण्यासाठी तो जर्मनीमध्ये उपचार घेणार असल्याची माहिती मिळाली.दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याआधीच झालेल्या दुखापतीमुळे राहुलला मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची धुरा ऋषभ पंतच्या खांद्यावर आली. राहुलची दुखापत गंभीर असल्याने त्याला यातून सावरण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे आणि यामुळेच त्याला आगामी इंग्लंड दौऱ्यातूनही माघार घ्यावी लागली. त्याचवेळी, काही प्रसारमाध्यमांतून माहिती मिळाली की, आता दुखापतीतून सावरण्यासाठी राहुल लवकरच जर्मनीला रवाना होणार आहे. तसेच, राहुलला उपचारांसाठी जर्मनीला पाठविणार असल्याचे बीसीसीआय सचिव जय शहा यांनीही स्पष्ट केले.
गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रकोपामुळे पाच सामन्यांची कसोटी मालिका पूर्ण होऊ शकली नव्हती. चार सामने झाल्यानंतर भारतीय संघात कोरोनाचा प्रवेश झाल्याने ही मालिका स्थगित करण्यात आली होती. मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील अखेरचा पाचवा सामना १ ते ५ जुलैदरम्यान खेळविला जाणार आहे. या सामन्यानंतर प्रत्येकी तीन सामन्यांची टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळविण्यात येईल.कसोटीपटू इंग्लंडकडे रवानाइंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याची तयारी करण्यासाठी भारतीय कसोटी संघातील काही खेळाडूंनी इंग्लंडसाठी उड्डाण केले. नियमित फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड आणि इतर सपोर्ट स्टाफ इंग्लंडसाठी रवाना झाला आहे. माजी कर्णधार विराट कोहली, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, मुहम्मद शामी आणि रवींद्र जडेचा यांनी इंग्लंडला जाण्यासाठी उड्डाण घेतले. भारतीय संघाने गुरुवारी मुंबई विमानतळावरून इंग्लंडच्या दिशेने उड्डाण केले. संघ लिस्टर शहरामध्ये पोहोचेल.
गिल खेळणार सलामीला? लोकेश राहुल दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यात खेळणार नसल्याने त्याच्या अनुपस्थितीमध्ये कर्णधार रोहित शर्मासह सलामीला शुभमन गिलला संधी मिळू शकते. सलामीचा दुसरा पर्याय म्हणून विराट कोहलीकडेही पाहिजे जाऊ शकते. मात्र, याबाबत अद्याप बीसीसीआयकडून कोणतीही माहिती मिळाली नाही.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.