इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील लखनौ सुपर जायंट्सचा प्रवासही संपला... मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवून त्यांनी स्पर्धेचा निरोप घेतला. आयपीएलमध्ये पहिल्यांदाज लखनौचा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरू शकला नाही. लोकेश राहुलच्या ( KL Rahul) नेतृत्वाखाली LSG ने १४ पैकी ७ सामने जिंकून सहाव्या क्रमांकासह स्पर्धेचा निरोप घेतला. लोकेशला या स्पर्धेत केवळ नेतृत्वात अपयश आले नाही, परंतु त्याने फलंदाजीत कमाल दाखवली. तरीही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीची त्याची टीम इंडियाची बस चुकली.
लोकेशने १४ सामन्यांत ५२० धावा केल्या, परंतु त्याच्या स्ट्राईक रेट हा १३६.१२ असा असल्याने त्याचा वर्ल्ड कपसाठी विचार केला गेला नसावा असा अंदाज आहे. आयपीएल २०२४ नंतर भारतीय खेळाडू ट्वेंटी-२०वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अमेरिकेला रवाना होतील. दोन बॅचमध्ये भारतीय संघ अमेरिकेत दाखल होतील आणि पहिली बॅच २५ मे रोजी निघेल असा अंदाज आहे. आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये पात्र न ठरलेल्या संघातील खेळाडू ज्यांची वर्ल्ड कपसाठी निवड झाली आहे, ते पहिल्या बॅचमध्ये असतील. असा वेळेस लोकेश राहुलला आता तू काय करणार असे विचारण्यात आले. त्यावर त्याने मन जिंकणारे उत्तर दिले.
तो म्हणाला, मी माझ्या सासऱ्यांचा आवडता खेळाडू शर्मा जी का बेटा याच्यासाठी चिअर करणार. आयपीएलपूर्वी एका बेटिंग अॅपने जाहिरात बनवली होती, त्यात सुनील शेट्टी हे रोहितच्या बाजूने असलेले दाखवण्यात आले. त्याचा आधार घेत लोकेशने ही कमेंट केली.
सामन्यात काय झालं?नाणेफेक जिंकल्यानंतर MIने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. लोकेश राहुल (५५ धावा) आणि निकोलस पूरन ( ७५ धावा) यांच्या फटकेबाजीने संघाला ६ बाद २१४ धावांपर्यंत पोहोचवले. लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा ( ६८ धावा) आणि डेवाल्ड ब्रेव्हिस ( २०) यांची ८८ धावांची भागीदारी तुटल्यानंतर मुंबईच्या फलंदाजांनी रांग लावली. नमन धीरच्या (२८ चेंडूत ६२* धावा, ४ चौकार आणि ५ षटकार) जबरदस्त खेळीमुळे मुंबईला आशा दाखवली होती. पण, त्यांची १८ धावेने हार झाली. मुंबईला ६ बाद १९६ धावाच करता आल्या