Rohit Sharma Virat Kohli KL Rahul, India vs Bangladesh: टीम इंडिया घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका (IND vs BAN Test Series) खेळणार आहे. पहिला सामना १९ सप्टेंबरपासून चेन्नई येथे खेळवला जाईल. तर दुसरा सामना २७ सप्टेंबरपासून सुरु होईल. या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ दोन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला. संघात रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांच्यासह केएल राहुललाही संधी देण्यात आली आहे. बांगलादेशने नुकतीच पाकिस्तानात पहिलीवहिली कसोटी मालिका जिंकली. त्यामुळे त्यांच्याविरोधात भारताने अनुभवी संघ उतरवला आहे. पण याच संघातील केएल राहुलबद्दल प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने मोठे विधान केले.
"मला वैयक्तिक स्तरावर केएल राहुल खूप आवडतो. तो खूपच प्रतिभावान खेळाडू आहे. त्याने आगामी कसोटी मालिकेत भरपूर धावा केल्या तर तो पुढे जात राहिल. सध्या तरी तो मला कमनशिबी खेळाडू वाटतो. कारण तो उत्तम खेळाडू आहे पण विराट कोहली आणि रोहित शर्माला मिळणारी प्रसिद्धी त्याला झाकोळून टाकते. भारतीय क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा ही दोन बडी नावे आहेत. राहुल कितीही टॅलेंटेड असला तरीही तो त्यांच्या सावलीखाली लपला जातो असं मला वाटतं," असं आकाश चोप्रा म्हणाला.
"केएल राहुल जोपर्यंत धावा करत राहिल तोपर्यंत तो संघाचा भाग असेल. भारतीय संघात केएल राहुलला अनुभवी आणि बडा खेळाडू म्हणून पाहिले जाते. पण तो फॉर्ममध्ये नसेल तर त्याच्याविरोधात वातावरण निर्मितीही झटपट होते. अनेक लोक त्याच्यावर टीका करण्यासाठी तुटून पडतात. त्यामुळे त्याच्याइतक्या टॅलेंटेड खेळाडूला फॉर्ममध्ये नसताना जितका काळ मिळतो, तितका काळ राहुलला मिळत नाही. जर मला विचाराल तर मी त्याला नक्कीच भरपूर संधी देईन. कारण त्याने मोक्याच्या वेळी आणि कठीण प्रसंगात भरपूर धावा केल्या आहेत," असे रोखठोक मत आकाश चोप्राने मांडले.