ऑकलंड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये रिषभ पंतला यष्टीरक्षण करता आले नव्हते. यावेळी लोकेश राहुलने उत्तमरीत्या यष्टीरक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती. पण आता न्यूझीलंडच्या दौऱ्यात राहुलकडेच यष्टीरक्षणाची जबाबदारी राहणार की पंतला संधी मिळणार, यावर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
बऱ्याच संधी देऊनही भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत हा सातत्याने नापास होत राहीला. त्याला संघात स्थान देत असल्यामुळे कर्णधार विराट कोहलीवरही टीका होत होती. पण आता तर पंतसाठी संघाचे दरवाजे बंद झाल्याचे समजत आहे. कारण कोहलीनेच याबाबतचे एक वक्तव्य केले होते.
न्यूझीलंडच्या दौऱ्यापूर्वी भारताचे तीन खेळाडू जायबंदी झाले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रिषभ पंत जायबंदी झाला, त्यानंतर तो भारतीय संघाला दिसला नाही. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाला आणि तिसऱ्या सामन्यात त्याला खेळता आले नाही. पण आता तर भारताचा स्टार गोलंदाज जायबंदी झाल्याचे म्हटले जात आहे.
पंत जायबंदी झाल्यानंतर संघात यष्टीरक्षकाला स्थान देण्यात आले नाही. पंतच्या जागी लोकेश राहुलने त्यानंतर भारताच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलली. राहुलने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला यष्टीचीत केले आणि त्यानंतर पंतचा पत्ता कट झाल्याचे म्हटले जाऊ लागले.
याबाबत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की, " सध्याच्या घडीला संघात जे समीकरण सुरु आहे ते चांगलेच आहे. त्यामुळे सध्या संघातील समीकरणावर आम्ही लक्ष केंद्रीत करत आहोत." शास्त्री यांच्या म्हणण्यानुसार न्यूझीलंडच्या दौऱ्यात पंतला संधी मिळण्याची शक्यता फारच कमी असल्याचे दिसत आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात रिषभ पंतला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असून अजूनही पंत मुंबईत डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजी करत असताना एक चेंडू पंतच्या हॅल्मेटवर आदळला होता. यावेळी पंतला दुखापत झाल्याचे म्हटले गेले. सध्याच्या घडीला पंत हा डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे, त्याचबरोबर त्याच्या काही चाचण्याही केल्या जाणार आहेत.