Asia Cup 2023 : आशिया चषक स्पर्धेसाठी निवड झालेल्या भारतीय खेळाडूंनी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या (KSCA) अलूर येथील थ्री ओव्हल कॅम्पसमध्ये गुरुवारपासून सुरू होणाऱ्या सहा दिवसीय कंडिशनिंग शिबिरासाठी बंगळुरू येथे येण्यास सुरुवात केली आहे. शिबिराचे लक्ष्य वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या अंतिम टप्प्यात जाण्यापूर्वी संघ बाँडिंगवर आहे. शिवाय विंडीज दौऱ्यापासून विश्रांतीवर गेलेल्या खेळाडूंना १३ दिवसांचा फिटनेस प्रोग्राम दिला गेला होता आणि त्यांची Yo-Yo Test होणार आहे. सध्यातरी विराटने या टेस्टमध्ये १७.२ गुण कमावल्याचे वृत्त समोर आले आहे.
१८ पैकी पंधरा खेळाडू ( अपवाद संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह आणि प्रसिध कृष्णा ) शिबिरात दाखल झाले आहेत. हे खेळाडू तंदुरुस्तीचे मूल्यांकन करतील आणि त्यानंतर सुरुवातीच्या दिवशी काही इनडोअर सत्रे होतील. शुक्रवारपासून, खेळाडूंना मैदानी कंडिशनिंग आणि कौशल्य-आधारित कार्यक्रमांसाठी बॅचमध्ये विभागले जाईल. श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि जाण्यासाठी तयार आहे. मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेनंतर प्रथमच या शिबिरात तो वरिष्ठ संघात पुनरागमन करत आहे. अय्यरने दोन्ही सराव सामन्यांनंतर चांगली कामगिरी केली आहे.
केएल राहुल कसा वर खेचतो हे औत्सुक्याचे ठरेल. आशिया चषक स्पर्धेसाठी तो केवळ सशर्त तंदुरुस्त मानला गेला आहे. मांडीच्या दुखापतीतून तो पूर्णपणे बरा झाला आहे. पण, राहुलला किरकोळ निगल झाला आहे आणि तो किमान पहिल्या दोन आशिया कप सामन्यांसाठी खेळणे अवघड आहे. क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, NCAची वैद्यकीय टीम राहुलच्या फलंदाजीच्या वर्कलोडवर खूश असल्याचे मानले जाते, परंतु ते त्याच्या यष्टीरक्षणाच्या भाराचे काळजीपूर्वक निरीक्षण करत आहेत. गेल्या आठवड्यात सराव सामन्यांपैकी एका सामन्यानंतर त्याने वेदना झाल्याची तक्रार केल्याचे समजते.
भारतीय संघ ३० ऑगस्टला बंगळुरूहून कोलंबोला रवाना होणार आहे. २ सप्टेंबरला पल्लेकेलेमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेची सुरुवात करणारा भारत अंतिम फेरीत पोहोचल्यास जास्तीत जास्त सहा सामने खेळू शकतो. भारताची विश्वचषक मोहीम सुरू होण्यापूर्वी आशिया कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील.