सचिन तेंडुलकर... आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महान खेळाडू. वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा पहिला पुरुष क्रिकेटपटू, शतकांचे शतक साजरा करणारा पहिला फलंदाज, 34 हजाराहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा असलेला एकमेव फलंदाज, असे अनेक विक्रम महान फलंदाज तेंडुलकरच्या नावावर आहेत. त्यानं खऱ्या अर्थानं भारतीयांना क्रिकेटच्या प्रेमात पाडले. त्याचा खेळ पाहण्यासाठी लोकं हातातील काम सोडून टिव्हीसमोर बसायचे. जगभरातील दिग्गज गोलंदाजांच्या मनात तेंडुलकरच्या नावाची धास्तीच असायची. पण, पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं 2006च्या कसोटी मालिकेतील आठवण सांगताना तेंडुलकरला त्याच्या गोलंदाजीवर हूक व पूल मारण्यात अडचण होत असल्याचा दावा केला.
तेंडुलकर हा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे, यात कोणाचेही दुमत नसेल. पण, अन्य खेळाडूंप्रमाणे त्याच्याही क्रिकेट कारकिर्दीत चढउतार आले. त्याला कारकिर्दीत टेनिस एल्बोच्या दुखापतीनं भरपूर त्रास दिला. त्यामुळे त्याला फलंदाजी करतानाही अनेकदा अडचण होत असल्याचे निदर्शनास आले होते. 2006मध्ये भारताच्या पाकिस्तान दौऱ्यावर तेंडुलकर त्या दुखापतीतच खेळला होता.
या मालिकेसंदर्भात बोलताना अख्तर म्हणाला,'' तेंडुलकरच्या टेनिस एल्बो दुखापतीबाबत मला माहीत होतं. त्यामुळे त्याला रोखण्यासाठी मी एक प्लान आखला होता. त्यामुळे या मालिकेत मी त्याच्यावर बाऊंसरचा भडिमार केला. तो खूप शांत स्वभावाचा फलंदाज होता. त्यामुळे त्याला डिवचण्याचा प्रयत्न करूनही काहीच उपयोग झाला नाही. टेनिस एल्बोची समस्या असल्यामुळे तो हूक किंवा पूल मारू शकत नव्हता, याची मला जाण होती. त्यामुळे त्याला रोखण्यासाठी मी बाऊंसर टाकले होते.''
राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर गेली होती. पहिले दोन सामना अनिर्णित राहिल्यानंतर इंझमाम-उल-हकच्या पाक संघानं निर्णायक सामना 341 धावांनी जिंकून मालिका 1-0 अशी खिशात घातली.
मार्टिन क्रोव आणि राहुल द्रविड यांचे कौतुक...मार्टिन क्रोव हा माझ्या गोलंदाजीचा उत्तम प्रकारे सामना करायचा. भारतीय फलंदाजांमध्ये राहुल द्रविडमध्ये ती कला होती. त्याचा बचाव भेदणे अवघड होते,'' असे अख्तर म्हणाला.