कोलकाता : ‘गब्बर’ शिखर धवनच्या (९७*) आक्रमक नाबाद अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने शानदार विजय मिळवताना कोलकाता नाइट रायडर्सचा ७ गड्यांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने २० षटकात ७ बाद १७८ धावा उभारल्यानंतर दिल्लीकरांनी १८.५ षटकातच केवळ ३ फलंदाजांच्या मोबदल्यात १८० धावा केल्या. धवनने अखेरपर्यंत नाबाद राहताना ६३ चेंडूत ११ चौकार व २ षटकारांसह ९७ धावा केल्या. यासह दिल्लीने ८ गुणांची कमाई करताना गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले असून कोलकाता पराभवानंतरही दुसऱ्या स्थानी कायम आहे.
इडन गार्डनवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या दिल्लीकरांनी ठराविक अंतराने धक्के देत यजमानांना रोखले. दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ (१४) पुन्हा एकदा चांगल्या सुरुवातीनंतर अपयशी ठरला. कर्णधार श्रेयस अय्यरही (६) झटपट परतला. मात्र धवनने रिषभ पंतसह १०५ धावांची भागीदारी करुन दिल्लीचा विजय साकारला. पंतने ३१ चेंडूत ४ चौकार व २ षटकारांसह ४६ धावा केल्या. दिल्लीचा विजय १७ धावांनी दूर असताना पंत बाद झाला. परंतु, धवनने अखेरपर्यंत टिकून राहत संघाच्या विजयावर शिक्का मारला. त्याचे शतक केवळ ३ धावांनी हुकले. कॉलिन इंग्रामने (१४*) षटकार ठोकून दिल्लीला विजयी केले.
तत्पूर्वी, शुभमान गिलचे (६५) अर्धशतक आणि आंद्रे रसेलचा (४५) झंझावात या जोरावर कोलकाताने आव्हानात्मक मजल मारली. डावातील पहिल्याच चेंडूवर इशांत शर्माने जो डेनली याला त्रिफळाचीत केल्यानंतर गिल-रॉबिन उथप्पा यांनी ६३ धावांची भागीदारी करुन कोलकाता सावरले. (वृत्तसंस्था)
आंद्रे रसेल आयपीएलमध्ये सलग सहाव्या डावात ४० हून अधिक धावांची खेळी करताना अशी कामगिरी करणाºया फलंदाजांमध्ये दुसरे स्थान मिळवले. कोलकाताच्याच रॉबिन उथप्पाने सलग १० वेळा अशी कामगिरी केली असून वीरेंद्र सेहवाग, माइक हसी, अजिंक्य रहाणे आणि जोस बटलर यांनी प्रत्येकी ५ वेळा ४० हून अधिक धावांची खेळी केली आहे.आंद्रे रसेलचा पराक्रम..कोलकाताचा धडाकेबाज अष्टपैलू आंद्रे रसेल याने या सामन्यात विक्रमी कमगिरीकरताना आयपीएलमध्ये सर्वात कमी सामन्यांत हजार धावा आणि ५० बळी अशी कामगिरी केली. रसेलने केवळ ५७ सामन्यांत अशी कामगिरी करताना मुंबई इंडियन्सच्या किएरॉन पोलार्ड (६२) याला मागे टाकले. यानंतर शेन वॉटसन (६२, चेन्नई), ड्वेन ब्रावो (७८, चेन्नई) आणि जॅक कॅलिस (७९, कोलकाता) यांचा क्रमांक आहे.
पाचवा ‘गोल्डन डक’आयपीएलमध्ये पदार्पणात शून्यावर बाद होणारा जो डेनली केकेआरचा पाचवा फलंदाज ठरला. याआधी असा ‘गोल्डन डक’ जेसन होल्डर, सुनील नरेन, मनोज तिवारी आणि आरिंदम घोष यांनी नोंदवला आहे.रसेलमुळे कोलकाताची आव्हानात्मक मजलकागिसो रबाडाने रॉबिन उथप्पाला (२८) बाद करुन कोलकाताला मोठा धक्का दिला. मात्र गिलने सर्व सूत्रे आपल्याकडे घेत दिल्लीला चोप दिला. त्याने ३९ चेंडूत ७ चौकार व २ षटकारांसह ६५ धावा फटकावल्या.नितिश राणा आणि कर्णधार दिनेश कार्तिक अपयशी ठरल्यानंतर धडाकेबाज रसेलने आपल्या लौकिकानुसार चौफेर फटकेबाजी करताना केवळ २१ चेंडूत ३ चौकार व ४ षटकारांसह ४५ धावांचा तडाखा दिला.रसेलच्या आक्रमतेमुळे कोलकाताने आव्हानात्मक मजल मारली. ख्रिस मॉरिस, रबाडा आणि पॉल यांनी प्रत्येकी २ बळी घेत कोलकाताला रोखण्याचा प्रयत्न केला.
संक्षिप्त धावफलक : कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकात ७ बाद १७८ धावा (शुभमान गिल ६५, आंद्रे रसेल ४५; ख्रिस मॉरिस २/३८, कागिसो रबाडा २/४२, कीमो पॉल २/४६.) पराभूत वि. दिल्ली कॅपिटल्स : १८.५ षटकात ३ बाद १८० धावा (शिखर धवन नाबाद ९७, रिषभ पंत ४६; नितिश राणा १/१२, प्रसिद्ध क्रिष्णा १/२५, आंद्रे रसेल १/२९.)