भारतामध्ये पहिल्यांदाच दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर होणार आहे. हा सामना दिवस-रात्र असल्यामुळे या लढतीच्या तिकीटी महाग असतील, असे चाहत्यांना वाटत आहे. त्यामुळे बंगाल क्रिकेट असोसिएशनने या सामन्याच्या तिकिटांचे दर किती ठेवले आहेत, याबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील कोलकात्यामध्ये होणारा कसोटी सामना दिवस-रात्र खेळवण्यात येणार आहे. या स्टेडियमची क्षमता 68 हजार आहे. भारतातील सर्वात मोठे स्टेडियम म्हणून ईडन गार्डन्सचे नाव घेतले जाते. पण आता पहिल्याच दिवस-रात्र कसोटीला चाहत्यांचा कसा प्रतिसाद मिळतो, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. त्यामुळे बंगाल क्रिकेट असोसिएशनने या सामन्याचे दर फारच कमी ठेवले आहेत. या सामन्याची कमीत कमी 50 रुपयांमध्ये तिकिट मिळू शकते. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सचिव अभिषेक दालमिया यांनी ही माहिती दिली.
दालमिया म्हणाले की," आम्ही 2.30 वाजता नाही तर 1.30 ला सामना सुरु करणार आहोत. त्यामुळे हा सामना 8.30 ला संपू शकेल. चाहत्यांनी लवकर घरी जाण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे. या सामन्याचे तिकीट दर 50, 100, 150 रुपये असे ठेवण्यात आले आहेत.
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेला 3 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेनंतर भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामने होणार आहेत. पहिला कसोटी सामना इंदूर येथे, तर दुसरा सामना कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डनवर खेळवला जाणार आहे. या कसोटीबाबत टीम इंडियानं मोठा निर्णय घेतला आहे आणि आता त्याला बांगलादेश क्रिकेट मंडळाकडूनही सहमती मिळाली आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी कोलकाता कसोटी ऐतिहासिक ठरणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावर विराजमान होताच माजी कर्णधार सौरव गांगुलीनं टीम इंडियानं डे-नाईट कसोटी खेळावी असा प्रस्ताव ठेवला होता. त्यादृष्टीनं पाऊलं उचलताना बीसीसीआयनं कोलकाता येथे होणारी कसोटी डे नाईट खेळवावी असा प्रस्ताव बांगलादेश क्रिकेट मंडळाकडे पाठवला होता. बांगलादेश क्रिकेट मंडळाचे चेअरमन अक्रम खान यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण, याबाबत अद्याप विचार केला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. पण, मंगळवारी बांगलादेश क्रिकेट मंडळानेही डे-नाईट कसोटी खेळण्यावर सहमती दर्शवली.
दोन दिवसांपूर्वी ते म्हणाले होते की,''बीसीसीआयनं आमच्याकडे डे नाईट कसोटीचा प्रस्ताव ठेवला आहे. संपूर्ण विचार केल्यानंतर आम्ही आमचा निर्णय त्यांना कळवणार आहोत. मागील तीन दिवसांत आम्हाला दोन पत्र पाठवण्यात आले आहेत. आम्ही त्याचा विचार करत आहोत, परंतु अजून त्यावर चर्चा झालेली नाही. येत्या एक-दोन दिवसांत आम्ही आमचा निर्णय कळवू.'' मंगळवारी त्यांनी त्यांचा निर्णय कळवला. सौरव गांगुलीनं ही माहिती दिली.
भारताचा कसोटी संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धीमान साहा ( यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुबमन गिल, रिषभ पंत.
14 ते 18 नोव्हेंबर - पहिली कसोटी, इंदूर
22 ते 26 नोव्हेंबर - दुसरी कसोटी, कोलकाता
Web Title: Know the rates of tickets for the first day night test in Kolkata ...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.