मुंबई : भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यामध्ये विस्तवही जात नसल्याचे म्हटले जात होते. या दोघांमधील भांडणांमुळेच कुंबळे यांना पुन्हा प्रशिक्षकपद देण्यात आले नव्हते. पण त्याच कुंबळे यांनी आता विराटबद्दल एक वक्तव्य केलं आहे.
कुंबळे म्हणाले की, " भारतीय संघ सध्याच्या धडीला चांगली कामगिरी करत आहे. फक्त भारतामध्येच नाही तर परदेशातही भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. भारतीय संघाची चांगली बांधणी करण्यात आली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संघाची राखीव फळी मजबूत आहे. त्यामुळे एखादा मोठा खेळाडू संघात नसला तरी त्याची जागा बदली खेळाडू उत्तमरीत्या भरताना दिसत आहे."
कोहलीबाबत कुंबळे म्हणाले की, " कोहलीच्या नेतृत्वाखाली बऱ्याच खेळाडूंना संधी मिळाली आहे. गेल्या कसोटी सामन्यात शाहबाझ नदीमला संधी देण्यात आली. नदीमकडे स्थानिक क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. पण त्याला आतापर्यंत संधी मिळाली नव्हती. पण गेल्याच सामन्यात त्याला संधी दिली आणि त्यानेही चांगली कामगिरी केली."