पुणे, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : सध्याच्या घडीला भारताचा सलामीवीर मयांक अगरवाल हा भन्नाट फॉर्मामध्ये आहे. पहिल्या सामन्यात मयांकने द्विशतक झळकावले होते, तर दुसऱ्या सामन्यातही त्याने शतक लगावले. पण मयांकच्या या शतकांचे रहस्य आहे तरी काय, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हे रहस्य दस्तुरखुद्द मयांकनेच उलगडून सांगितले आहे.
आजच्या दिवसाचा मयांक हाच हिरो ठरला. त्यामुळे सामना झाल्यानंतर बीसीसीआयच्या ट्विटरवर त्याची खास मुलाखत चेतेश्वर पुजाराने घेतली. प्रत्येकवेळी चांगली गोष्ट केल्यावर, तुम्ही खाता तरी काय, असा प्रश्न सहज विचारला जातो. या प्रश्नावर मयांकने नेमके काय उत्तर दिले, ते वाचा...
या मुलाखतीमध्ये पुजाराने मयांकला विचारले की, गेले काही दिवस तू नक्की काय आहार घेत आहेस? या प्रश्नावर मयांक म्हणाला की, " सध्या मी इडली, नारळाची चटणी आणि सांबार खात आहे."
दुसऱ्या कसोटीत यजमानांनी मजबूत पकड बनवली आहे. पहिल्या सामन्यात दोन्ही डावांत शतकी खेळी करणारा रोहित शर्मा आज अपयशी ठरला असला तरी मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी शतकी भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत आणले. या दोघांची भागीदारी आफ्रिकेच्या कागिसो रबाडानं संपुष्टात आणली. पण, मयांकने खिंड लढवताना सलग दुसऱ्या कसोटीत शतकी खेळी केली. या कामगिरीसह त्यानं 10 वर्षांपूर्वीचा विरेंद्र सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी केली. शिवाय महान फलंदाज सचिन तेंडुलकर, हिटमॅन रोहित शर्मा आणि कॅप्टन विराट कोहली यांना न जमलेला विक्रमही केला. मयांकने थेट सुनील गावस्कर यांच्या पंक्तीत स्थान पटकावलं.
मयांकने 195 चेंडूंत 16 चौकार व 2 षटकारांसह 108 धावा केल्या. पहिल्या कसोटीत मयांकने द्विशतकी खेळी केली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दोन कसोटीत शतक झळकावणारा तो भारताचा दुसरा सलामीवीर ठरला आहे. यापूर्वी 2009-10मध्ये विरेंद्र सेहवागनं 2009-10 च्या मालिकेत आफ्रिकेविरुद्ध 109 आणि 165 धावांची खेळी केली होती. शिवाय आफ्रिकेविरुद्ध सलग दोन कसोटीत शतक करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी, मोहम्मद अझरुद्दीन ( 1996), विरेंद्र सेहवाग ( 2010), सचिन तेंडुलकर ( 2010) यांनी अशी कामगिरी केली आहे.
याशिवाय भारताकडून कसोटी पहिल्या दहा डावांत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत मयांकने तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं आजच्या खेळीसह पहिल्या दहा डावांत 605 धावा केल्या आहेत. या विक्रमात विनोद कांबळी ( 880) आणि गावस्कर ( 831) अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर चेतेश्वर पुजारा ( 570), सदगोपण रमेश ( 569), शिखर धवन ( 532), विरेंद्र सेहवाग ( 526) आणि सौरव गांगुली ( 504) यांचा क्रमांक येतो. विशेष म्हणजे यात तेंडुलकर आणि रोहित पिछाडीवर आहेत.
Web Title: know what the secrets of Mayank Agarwal's centuries are ...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.