ललित झांबरे
जळगाव - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या षटकारांची चर्चा आहे. धोनी, गेल, वॉर्नर अशा जुन्या खेळाडूंसोबत हार्दिक पंड्या, एव्हिन लुईससारखे नवे ताज्या दमाचे खेळाडू धडाक्यात सिक्सर मारत आहेत. गेल्या रविवारी तर एकाच दिवसात तब्बल 30 षटकार लगावल्या गेल्याने तो 'सिक्सर संडे' ठरला होता. त्यानंतर बुधवारी एव्हिन लुईसने इंग्रज गोलंदाजांची धुलाई करत एकट्यानेच सात षटकार लगावले. आजसुध्दा बंगळुरुत डेव्हिड वॉर्नरच्या शतकात चार षटकारांचा समावेश आहेच.
हे षटकारच हार्दिक व लुईससारख्या खेळाडूंची ओळख ठरत आहेत. एव्हिन लुईस म्हणतो, "लोक मला ज्युनियर गेल म्हणतात कारण मी गेलसारखेच खूप जास्त आणि उत्तुंग षटकार मारतो." आपला हार्दिक पंड्या म्हणतो,"मी तर लहानपणापासूनच षटकार मारत आलोय. फरक एवढाच की मी आता ते फार मोठ्या स्तरावरच्या सामन्यांमध्ये मारतोय म्हणून एवढी चर्चा होतेय."
तर अशा वातावरणात कोण आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकारांचा बादशहा? कोणी लगावलेय सर्वाधिक षटकार? हे जाणून घेण्याची इच्छा बळावतेच. याचाच शोध घेतला तर दिसून आले की पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी आहे षटकारांचा बादशहा!
कशावरुन...? तर आकडेवारी बघा.
कसोटी, वन-डे आणि टी-20 अशा तिन्ही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आजच्या घडीला सर्वाधिक षटकार त्याच्या नावावर आहेत. 523 सामन्यात 476 षटकार!
नजिकच्या काळात वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलकडून आफ्रिदीच्या या विक्रमाला धोका आहे कारण सद्यस्थितीत ख्रिस गेलचे आहेत 426 सामन्यात 448 षटकार! आणि गेल अजून खेळतोय तर आफ्रिदीने निवृत्ती पत्करलीय. तिसऱ्या स्थानी आहे न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्युलम. त्याचे आहेत 432 सामन्यात 398 षटकार!
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील टॉप-3 षटकारवीर
फलंदाज सामने षटकार1) शाहिद आफ्रिदी 523 4762) ख्रिस गेल 426 4483) ब्रेंडन मॅक्युलम 432 398
वन डे क्रिकेटमध्ये तर षटकारांच्या बाबतीत आफ्रिदी इतरांच्या कितीतरी पुढे आहे. वन डेतील टॉप- 3 षटकारवीर पाहिले तर हे पटकन लक्षात येईल.
वन- डे क्रिकेटचे टॉप-3 षटकारवीर
फलंदाज सामने षटकार1) शाहिद आफ्रिदी 398 3512) सनथ जयसूर्या 445 2703) ख्रिस गेल 271 247
बघा, गेल खेळत असला तरी त्याला अजून बराच पल्ला गाठायचाय.
आफ्रिदीच्या वन-डेतील षटकारांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अधिकृत वन-डे टीमचा दर्जा मिळालेल्या 12 पैकी पाच देशांविरुध्द सर्वाधिक षटकार ठोकणारा एकटा बूम-बूम आफ्रिदीच आहे. इतर कोणाही फलंदाजाला दोन देशांविरुध्दसुध्दा अशी कामगिरी करता आलेली नाही पण आफ्रिदीने भारत, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि झिम्बाब्वेविरुध्द वन डेत सर्वाधिक षटकार लगावले आहेत. आता त्याला बादशहा नाही म्हणणार तर काय म्हणणार?
टी- 20 मध्ये मात्र ख्रिस गेल 52 सामन्यांतच 103 षटकारांसह नंबर वन असून आफ्रिदी टी-20 च्या टॉप फाईव्हमध्ये सुध्दा नाही. कसोटी क्रिकेटमध्येही आफ्रिदी षटकारांच्या बाबतीत बऱ्याच खाली आहे. 27 कसोटीत फक्त 52 षटकार त्याच्या नावावर आहेत आणि कसोटीतला नंबर वन षटकारवीर ब्रेंडन मॕक्युलम त्याच्यापेक्षा दुपटीहून जास्त (107) पुढे आहे. असे असले तरी वन डे मधील शेकडो षटकार आणि तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील फटकेबाजीने 'बूम- बूम' आफ्रिदीला षटकारांच्या बादशहाचा किताब दिला आहे.
वन डेमध्ये आफ्रिदीचे प्रत्येक देशाविरुध्द षटकार
वन डेमध्ये प्रत्येक देशाविरुध्द सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज