मुंबई : भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी आज रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली. पण आता भारतीय संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकांची निवड अद्याप बाकी आहे. आता भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकांची निवड करण्यात येणार आहे. पण ही निवड कधी आणि केव्हा होणार, ते जाणून घ्या...
भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकासाठी बरेच अर्ज आले होते, त्यापैकी सात अर्ज बीसीसीआयच्या सल्लागार समितीने निवडले आहेत. या सात उमेदवारांमध्ये विद्यमान गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरूण यांचेही नाव आहे. अरूण यांच्याबरोबर इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज डॅरेन गॉफ आणि लंडनमधील गोलंदाजी प्रशिक्षक स्टीफन जोंस यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर भारताचे माजी गोलंदाज वेंकटेश प्रसाद, पारस म्हांब्रे, सुनील जोशी, अमित भंडारी आणि सुब्रतो बॅनर्जी हे उमेदवार भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये आहेत.
गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी पात्र ठरलेल्या प्रत्येक उमेदवाराला प्रेझेंटेशन करण्यासाठी २० मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे. ही निवड प्रक्रीया मुंबईत होणार असून १९ ऑगस्ट रोजी भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची निवड होणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावर अखेर रवी शास्त्रीच यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी ही त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीनं टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड केली. या पदासाठी सहा जणांमध्ये चुरस रंगली होती, परंतु शास्त्रींनी अपेक्षेप्रमाणे बाजी मारली. कॅप्टन विराट कोहलीनेही आपले वजन शास्त्रींच्या तराजूत टाकले होते. त्यामुळे कोहलीची ईच्छा पूर्ण झाल्याचे बोलले जात आहे.
ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू टॉम मूडी आणि न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू व आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचे माजी प्रशिक्षक माइस हेसन यांच्यासह 2007 सालच्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचे तत्कालीन व्यवस्थापक लालचंद राजपूत, मुंबई इंडियन्सचे माजी प्रशिक्षक रॉबिन सिंग, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स यांनीही या पदासाठी अर्ज केले होते. शास्त्री भारतीय संघासोबत वेस्ट इंडिज दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची मुलाखत व्हिडीओ कॉन्फरन्सने घेण्यात आली. त्यांनी सर्वात शेवटी मुलाखत दिली.