दुबई : भारतीय कर्णधार विराट कोहलीने सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्काराचा मान मिळवला आहे. त्याने गेल्या १० वर्षांतील सर्वश्रेष्ठ पुरुष क्रिकेटपटू पुरस्कारासाठी सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी पटकावली. कोहलीची दशकातील सर्वश्रेष्ठ वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणूनही निवड झाली. माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयसीसीचा दशकातील खिलाडूवृत्ती पुरस्काराचा मानकरी ठरला. चाहत्यांनी २०११ मध्ये नॉटिंघम कसोटीत इयान बेल अजब स्थितीत धावबाद झाल्यानंतर त्याला परत खेळायला बोलविण्यासाठी धोनीची या पुरस्कारासाठी निवड केली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ट्विटरवर कोहलीची या पुरस्कारासाठी निवड झाल्याची घोषणा केली. कोहीलने ‘आयसीसी पुरस्कारा’च्या कालावधीत आपल्या ७० पैकी ६६ आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. या कालावधीत त्याच्या नावावर सर्वाधिक अर्धशतके (९४), सर्वाधिक धावा (२०३९६) या व्यतिरिक्त ७० पेक्षा अधिक डावांत खेळताना सर्वाधिक सरासरी (५६.९७) अशी कामगिरी आहे. एकूण विचार करता ३२ वर्षीय कोहलीने वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांत १२,०४० धावा, कसोटी क्रिकेटमध्ये ७,३१८ धावा आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत २,९२८ धावा केल्या आहेत.
आयसीसीने ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्मिथला दशकातील सर्वोत्तम कसोटीपटू तर अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशीद खानला दशकातील सर्वश्रेष्ठ टी-२० क्रिकेटपटू म्हणून निवडले. ऑस्ट्रेलियाच्या एलिस पॅरीने महिला पुरस्कारांमध्ये वर्चस्व गाजवविले.