महान फलंदाज सचिन तेंडुलकर, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांचे जगभरात फॅन्स आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाचा वापर करून ऑस्ट्रेलियातील बिल्डर ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरीया येथील बिल्डरांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी येथील रस्त्यांना कोहली, तेंडुलकर आदी दिग्गजांची नावं दिली आहेत. त्यामुळे 'Kohli Crescent', Tendulkar Drive', 'Kallis Way','Dev Terrace' आदी नावं येथील रस्त्यांवरील फलकांवर झळकताना दिसत आहेत.( भारतीय क्रिकेट वाटचालीचा साक्षीदार हरपला; माजी खेळाडूनं झोपेतच घेतला अखेरचा श्वास)
दिग्गज खेळाडूंची नावं दिल्यानंतर ग्राहकांचे चौकशीसाठी फोन वाढल्याचे येथील बिल्डर वरुण शर्मा यांनी सांगितले. ते म्हणाले,''Kohli Crescent येथे राहायला कोणाला आवडणार नाही? येत्या डिसेंबरमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणार आहे आणि कदाचित टीम इंडियाचा कर्णधार या रस्त्यांवर गाडी चालवताना पाहायला मिळेल.''
कोहली, तेंडुलकरसह येथे स्टीव्ह वॉ, गॅरी सोबर्स, रिचर्ड हॅडली आणि वसीम अक्रम आदींच्या नावांचेही रस्ते आहेत. मेल्टन शहराचे महापौर लारा कार्ली यांनी सांगितले की,''विकासकांकडून रस्त्यांची नावं सुचवली जातात आणि त्यानंतर त्यांना मान्यता दिली जाते. या क्रिकेटपटूंची नावं चाहत्यांमध्ये प्रचलित आहेत.'' हे असं पहिल्यांदाच घडत नाही. यापूर्वी न्यूझीलंडमधील वेलिंग्टन येथील रस्त्याला सुनील गावस्कर यांचे नाव देण्यात आले होते. ( अम्फान वादळ: दहा हजार कुटुंबीयांच्या मदतीसाठी सौरव गांगुली रस्त्यावर! )