मेलबोर्न : क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकृत संकेतस्थळाने विराट कोहली याला दशकातील सर्वोत्कृष्ट कसोटी आणि महेंद्रसिंग धोनी याची एकदिवसीय कर्णधार म्हणून निवड केली आहे. कोहलीला कसोटीसह एकदिवसीय संघातही स्थान मिळाले. विराट गेल्या १० वर्षांतील सर्वोत्तम फलंदाज ठरला. त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतके असून त्याच्यापुढे केवळ सचिन (१००) व रिकी पाँटिंग (७१) आहेत.
कोहलीने सर्वच प्रकारात ५० हून अधिक सरासरीने धावा केल्या. त्याच्या नावे २१,४४४ आंतरराष्टÑीय धावांची नोंद असून, सचिन (३४,३५७) व पाँटिंग (२७,४८३) आघाडीवर आहेत. कसोटी संघात अॅलिस्टर कूक, डेव्हिड वॉर्नर, केन विलियम्सन, स्टीव्ह स्मिथ, एबी डिव्हिलियर्स, बेन स्टोक्स, डेल स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड, नॅथन लियोन व जेम्स अँडरसन यांनाही स्थान मिळाले आहे. एकदिवसीय संघाचे नेतृत्व धोनीकडे असून, या संघात रोहित शर्मा व हाशिम अमला हे सलामीवीर आहेत. तसेच कोहली, डिव्हिलियर्स, शाकिब अल हसन, जोस बटलर, राशिद खान, मिशेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट व लसिथ मलिंगा हेदेखील संघात आहेत.कोहलीने यंदाच्या दशकात सातत्यपूर्ण कामगिरी करताना जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा राखला. त्याने या दशकात क्रिकेटच्या सर्व प्रकारात मिळून सर्वाधिक २० हजारांहून अधिक धावा काढण्याचा पराक्रम केला आहे.