Join us  

कोहलीची घसरण, तरीही अव्वल पाचमध्ये कायम

एकदिवसीय क्रमवारी; धवन, अय्यर यांनी केली प्रगती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 6:03 AM

Open in App

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी जाहीर केलेल्या नव्या एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजांमध्ये भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची एका स्थानाने घसरण झाली. मात्र, तरीही त्याने अव्वल पाचमध्ये आपले स्थान कायम राखले. त्याचवेळी, शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांनी फलंदाजीत आपले स्थान सुधारले. 

वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचे नेतृत्व करीत असलेल्या धवनने एका स्थानाने प्रगती करीत १३ वे स्थान मिळवले आहे. त्याने विंडीजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ९७ धावांची खेळी केली होती, तसेच विंडीजविरुद्ध सलग दोन अर्धशतक झळकावलेल्या श्रेयस अय्यरने २० स्थानांची मोठी झेप घेत ५४ वा क्रमांक मिळवला. सध्या खराब फॉर्मशी झगडत असलेला कोहली अजूनही भारताचा अव्वल फलंदाज ठरला आहे. त्याला क्रमवारीत एका स्थानाचा फटका बसला असून, तो पाचव्या स्थानी आला आहे. 

गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानी कायम असून, न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट अव्वल स्थानी आहे. भारताचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पहिल्यांदाच अव्वल १०० मध्ये प्रवेश करताना ९७ वे स्थान मिळवले. अव्वल दहामध्ये बुमराह हा एकमेव भारतीय आहे. त्याच्यानंतर 18 व्या स्थानी युझवेंद्र चहल असून, त्याला २ स्थानांचा फटका बसला आहे. 

अष्टपैलू खेळाडूंमध्ये भारताचा हार्दिक पांड्या दहाव्या स्थानी आहे. त्याची दोन स्थानांनी घसरण झाली. बांगलादेशचा शाकिब अल हसन अव्वल, तर अफगाणिस्तानचा मोहम्मद नाबी दुसऱ्या स्थानी आहे. सांघिक क्रमवारीत भारतीय संघ ११० गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड (१२८) आणि इंग्लंड (११९) अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या स्थानावर आहेत.

 

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ
Open in App