मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीने मैदानात चांगलेच नाव कमावले आहे. त्यामुळे मैदानाबाहेरही त्याचा ' भाव ' चांगलाच वधारलेला पाहायला मिळत आहे. कोहलीचे जाहीरातींमधून मिळणारे उत्पन्न पाहिले तर त्याने भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी यांनाही मागे टाकले आहे.
कोहलीकडे 2016 साली 20 जाहीराती होत्या, यामधून तो 120 कोटी कमावत होता. 2017 साली त्याच्याकडे 19 जाहीराती होत्या, म्हणजे गेल्या वर्षाच्या तुलनेत एक जाहीरात कमी झाली होती. पण या 19 जाहीरातींमधून कोहलीने तब्बल 150 कोटी रुपये कमावले आहेत. याचाच अर्थ कोहलीचा जाहीरात क्षेत्रातला भाव चांगलाच वधारलेला दिसत आहे. ईएसपी प्रॉपर्टीज और स्पोर्ट्स पॉवर यांच्या अहवालानुसार भारतीय क्रीडा क्षेत्रातील कोहली हा जाहीरांतींमध्ये अव्वल स्थानावर विराजमान आहे.
भारताचा यष्टीरक्षक धोनीकडे सध्याच्या घडीला 13 जाहीराती आहे. या 13 जाहीरातींमधून धोनीला 55-60 कोटी रुपये मिळत आहेत. मास्टर-ब्लास्टर सचिनकडे सध्या 9 जाहीराती आहेत. या 9 जाहीरातींमधून सचिनला 25-30 कोटी रुपये मिळतात. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याकडे सध्याच्या घडीला 7 जाहीराती आहेत. या सात जाहीरातींमधून पंड्याला 3.5-4 कोटी रुपये मिळत आहेत. भारताच्या युवा (19-वर्षांखालील) क्रिकेट संघातील पृथ्वी शॉ आणि इशाम किशन यांनी 2017 साली आपली पहिली जाहीरात केली आहे.