Join us  

आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत कोहली दुसऱ्या, तर रोहित तिसऱ्या स्थानावर 

रोहितने विंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातील अर्धशतकी खेळीच्या जोरावर महत्त्वपूर्ण गुण मिळवले. कोहलीच्या खात्यात ८२८ गुण असून, रोहित ८०७ गुणांसह त्याच्याहून एका स्थानाने मागे आहे. आझमच्या खात्यात सर्वाधिक ८७३ गुणांची नोंद आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 8:17 AM

Open in App

दुबई : भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात झळकावलेल्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत तिसरे स्थान कायम राखले. त्याने दुसऱ्या स्थानावरील विराट कोहलीसोबत गुणांमधील अंतरही कमी केले. कोहली क्रमवारीत दुसऱ्या स्थानी कायम असून, पाकिस्तानचा बाबर आझम अव्वल स्थानी आहे.रोहितने विंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातील अर्धशतकी खेळीच्या जोरावर महत्त्वपूर्ण गुण मिळवले. कोहलीच्या खात्यात ८२८ गुण असून, रोहित ८०७ गुणांसह त्याच्याहून एका स्थानाने मागे आहे. आझमच्या खात्यात सर्वाधिक ८७३ गुणांची नोंद आहे. 

गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल दहा स्थानांमध्ये कोणताही बदल झालेला नसून भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सातव्या स्थानी कायम आहे. अव्वल दहामध्ये स्थान मिळवलेला तो एकमेव भारतीय गोलंदाज आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट अव्वल स्थानी आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा आठव्या क्रमांकावर असून, बांगलादेशचा शाकिब अल हसन अव्वल स्थानी आहे. 

भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सपशेल अपयशी ठरलेला विंडीजचा आक्रमक फलंदाज शाय होपने अव्वल दहामधील स्थान गमावले. तसेच पाकिस्तानचा फखर झमा आणि इंग्लंडचा जो रुट यांनी अव्वल दहामध्ये स्थान मिळवले. अष्टपैलूंमध्ये विंडीजच्या जेसन होल्डरने चार स्थानांनी प्रगती करत अव्वल २० मध्ये स्थान मिळवले. 

टॅग्स :रोहित शर्माविराट कोहलीआयसीसी
Open in App