मुंबई : संघाच्या भवितव्यात कर्णधाराचे किती महत्वाचे योगदान असते, हे यंदाचे आयपीएल पाहिल्यावर नक्कीच लक्षात येईल. सध्याच्या घडीला गुणतालिकेत जे संघ अव्वल स्थानावर आहेत, त्या संघातील कर्णधारांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर संघापुढे आदर्श निर्माण केला आहे. त्याचबरोबर संघाला ते एकत्र घेऊन जाताना दिसत आहेत. जे संघ गुणतालिकेत तळाला आहेत त्यांच्या कर्णधारांना अजूनही चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याचबरोबर संघाची योग्य मोट न बांधल्यामुळे त्यांना पराभव पत्करावे लागले आहेत.
सनरायझर्स हदराबादचा संघ गुणतालिकेत अव्वल आहे. संघाचा कर्णधार केन विल्यमसनने दमदार कामगिरी करत संघापुढे आदर्श निर्माण केला आहे. तो फक्त धावाच करत नाही तर संघातील खेळाडूंची हाताळणीही शांतपणे करतो. जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीचा झेल सुटला तेव्हादेखील विल्यम्सन जास्त आक्रमक झाला नव्हता. त्याने चेहऱ्यावरही तसे काही दाखवले नाही, फक्त त्याने पुढच्या चेंडूवर त्या जागी क्षेत्ररक्षक बदलला. कोहलीचं दैवंही बलवत्तर नव्हतं. त्यामुळेच युसूफ पठाणने त्याचा अप्रतिम झेल पकडला. बँगलोरच्या संघात चांगले फलंदाज असले तरी त्यांना धावांचा पाठलाग करताना हैदराबादवर विजय मिळवता आला नाही. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये कोणत्या संघाने प्रथम फलंदाजी केली हे महत्वाचे नसते, तर विजयासाठी प्रत्येक षटकागणिक किती धावा हव्या आहेत, हे महत्वाचे असते.बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीला सध्या महेंद्रसिंग धोनी, रवी शास्त्री आणि संजय बांगर यांची उणीव जाणवत असल्याचे दिसत आहे. कारण भारतीय संघातून खेळत असताना त्याला गोलंदाजी कधी बदलायची, क्षेत्ररक्षण कसे लावायचे, यासाठी या तिघांची मदत होत असते.
आर. अश्विनने आपण हे चांगले अनुभवी क्रिकेटपटू आहोत, हे किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व करताना दाखवून दिले आहे. एक कर्णधार म्हणून त्याने चांगली कामगिरी केली आहे. अश्विनकडे भारतीय संघाचे उपकर्णधारपद सोपवण्यात आले होते. या गोष्टीचा त्याला पंजाबचे कर्णधारपद भूषवताना फायदा होत आहे. त्यामुळेच पंजाबची कामगिरी या हंगामात उजवी ठरताना दिसत आहे. या हंगामात अश्विनने लेग स्पिन करत गोलंदाजीमध्ये चांगलीच विविधता आणली आहे.
रोहित शर्मा जेव्हा चांगल्या धावा करतो तेव्हा मुंबई इंडियन्सची कामगिरी चांगली होत असल्याचे दिसत आहे. रोहितने पूर्ण आत्मविश्वासाने मुंबईच्या संघाची धुरा वाहिली आहे. जर मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सवर विजय मिळवला तर बाद फेरीत पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जीवंत राहतील.