ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत टीम इंडियाची सुरुवातच लाजीरवाण्या पराभवानं झाली. त्यानंतर भारतीय संघ पुनरागमन करेल, असे कुणालाही वाटले नव्हते. पण, टीम इंडियाच्या खेळाडूंनी जिद्दीच्या जोरावर मालिका वाचवलीच नाही, तर २-१ अशा फरकानं जिंकलीही...अॅडलेड कसोटीनंतर नियमित कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) पितृत्व रजेसाठी मायदेशात परतला, परंतु ऑस्ट्रेलिया सोडण्यापूर्वी विराटनं मध्यरात्री १२.३० वाजता बैठक बोलावली. टीम इंडियाच्या प्रमुख सदस्यांसोबतच्या या बैठकीत 'मिशन मेलबर्न' ठरलं. टीम इंडियाचे क्षेत्ररक्षक फलंदाज आर श्रीधऱ ( R Sridhar) यांनी याबाबत सांगितले.
गॅबा कसोटीनंतर फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) यानं यू ट्यूब चॅनेलवर श्रीधर यांच्यासोबत गप्पा मारल्या. त्यावेळी श्रीधर यांनी सांगितले की, अॅडलेट कसोटीतील पराभवानंतर मेलबर्न कसोटीचा प्लान ठरवण्यासाठी विराटनं १२.३० वाजता मॅसेज करून मिटींग बोलावली. तेव्हा मध्यरात्रीचे १२.३० वाजले होते आणि त्यानं विचारलं, तुम्ही काय करताय? मला धक्का बसला, विराट एवढ्या रात्री का मॅसेज करतोय, हेच कळले नाही. माझ्यासोबत रवी शास्त्री, भरत अरूण आणि विक्रम राठोड आहेत, असे मी त्याला कळवले. तेव्हा तो म्हणाला मी पण येतो.''
''तो आला आणि पुढील सामन्यांच्या रणनीतीवर चर्चा सुरू झाली. अशा प्रकारे मिशन मेलबर्न ठरले. तेव्हा शास्त्री म्हणाले होते की, या ३६ धावांची आठवण बॅजसारखी घाला. याच ३६ धावा आपल्याला ग्रेट टीम बनवतील,''असे श्रीधर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले,'' नक्की कोणते निर्णय घ्यायचे, याबाबत आम्ही थोडे संभ्रमात होतो. सकाळी विराटनं अजिंक्य रहाणेला कॉल केला आणि त्यानंतर पुन्हा चर्चा सुरू झाली. ३६ धावांवर ऑल आऊट झाल्यानंतर कोणताही संघ त्यांच्या फलंदाजांची फळी मजबूत करण्यावर भर देईल, परंतु शास्त्री, विराट आणि अजिंक्य यांनी गोलंदाजी बळकट करण्यावर भर दिला. त्यामुळेच विराटच्या जागी संघात रवींद्र जडेजाची निवड झाली आणि तोच मास्टरस्ट्रोक ठरला.''