मुंबईभारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या जबाबदारीवर महत्वाचं विधान केलंय. ''विराट कोहली वाईट कर्णधार नाही, पण रोहित शर्मा अधिक चांगला कर्णधार ठरला असता', असं मत गौतम गंभीरने व्यक्त केलं आहे.
स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरील 'क्रिकेट कनेक्टेड' या कार्यक्रमामध्ये तो बोलत होता. विराट आणि रोहितच्या कर्णधारपदाच्या गुणवत्तेत खूप मोठा फरक आहे. आयपीएलमधील दोघांच्या कर्णधारपदाच्या कामगिरीचा विचार केला पाहिजे, असंही गंभीरने म्हटलंय.
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. मुंबई इंडियन्सच्या खात्यात आयपीएलची ५ जेतेपदं आहेत. तर विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अद्याप एकदाही जेतेपद मिळवता आलेलं नाही. २०१६ सालच्या आयपीएलमध्ये उपविजेतेपद हीच बंगळुरूच्या संघाची आजवरची सर्वोत्तम कामगिरी राहीली आहे.
''आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर आपण जर भारतीय संघाची निवड करतो. मग संघाचा कर्णधार आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर का निवडला जाऊ नये?'', असा सवाल गंभीरने उपस्थित केला.