Join us  

पाठदुखीमुळे कोहली बाहेर, अय्यरला पोटदुखीचा त्रास

लोकेश राहुलकडे नेतृत्व, बुमराहकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 5:40 AM

Open in App

जोहान्सबर्ग : द. आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीस सुरुवात होण्यापूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या पाठीच्या वरच्या भागात दुखणे उमळल्याने त्याला सामन्यातून बाहेर व्हावे लागले. त्याच्या जागी उपकर्णधार लोकेश राहुल हा संघाचे नेतृत्व करीत असून, वेगवान जसप्रीत बुमराह उपकर्णधार असेल. याशिवाय मधल्या फळीतील फलंदाज श्रेसस अय्यर हादेखील पोटाचा त्रास उद्भवल्यामुळे सामन्याबाहेर झाला.नाणेफेक केल्यानंतर राहुल म्हणाला, ‘विराटच्या पाठीत वरच्या भागात दुखणे उमळले आहे.  तो फिजिओच्या देखरखीत उपचार घेत असून, पुढच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी अंतिम एकादशमध्ये हनुमा विहारीला स्थान देण्यात आले. फलंदाजीत लय मिळविण्याच्या प्रयत्नात असलेला ३३ वर्षांचा विराट आता केपटाऊनमध्ये मालिकेत तिसऱ्या सामन्यात स्वत:ची शंभरावी कसोटी पूर्ण करू शकणार नाही.भारतीय संघाच्या वेळापत्रकानुसार सर्व काही सुरळीत राहिल्यास कोहली बेंगळुरू येथे श्रीलंकेविरुद्ध फेब्रुवारीत शंभरावी कसोटी खेळेल.  काल कोच राहुल द्रविड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना कोहलीच्या संभाव्य दुखण्याची माहिती दिली नव्हती. कोहली बऱ्याच दिवसांपासून मीडियापुढे आलेला नाही. तिसऱ्या कसोटीआधी विराट मीडियाशी संवाद साधेल का, याची उत्सुकता आहे.कोहलीची नववर्षाची धमाल मस्ती, नंतर सराव!पाठीच्या दुखण्यामुळे कोहली दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला. नाणेफेकीच्या काही मिनिटांआधी हे वृत्त आले.  नववर्षाच्या सुरुवातीला झालेल्या पार्टीत विराटने धमाल मस्ती केली. या पार्टीत पत्नी अनुष्का शर्मा हीदेखील सहभागी झाली होती. त्यानंतर रविवारी फलंदाजीचा सराव करताना दिसला. नेटमध्ये त्याने चांगलाच घाम गाळला. यामुळे संघाबाहेर होण्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले. विराट आणि बीसीसीआय यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू झाल्यामुळे त्याच्या दुखण्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले.  सोशल मीडियावर चाहत्यांनी अनेक शंका उपस्थित केल्या. अचानक दुखणे कसे उपटले? हे अनेकांच्या पचनी पडलेले नाही.

टॅग्स :विराट कोहली
Open in App