बर्मिंगहॅम : कोरोनाची लागण झाल्याने कर्णधार रोहित शर्माला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातून माघार घ्यावी लागली. मात्र, यानंतर तो आता इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करेल. गुरुवारी बीसीसीआयने जाहीर केलेल्या भारताच्या टी-२० आणि एकदिवसीय संघात रोहितचा समावेश झाला आहे.
तीन सामन्यांची टी-२० मालिका ७ जुलैपासून साऊदम्पटन येथे सुरू होईल. खरे म्हणजे रोहित दुसऱ्या टी-२० सामन्यापासून खेळणार होता; पण कोरोनामुळे तो कसोटी सामन्यासाठी उपलब्ध राहणार नसल्याने रोहित आता तिन्ही सामन्यांत भारताचे नेतृत्व करेल. त्याच वेळी विराट कोहली, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांच्यासह पाच खेळाडू ९ जुलैला एजबस्टन येथे होणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यापासून खेळतील. दरम्यान, ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी मोहम्मद शमीचा विचार होणार नसल्याने इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याचा विचार झालेला नाही. त्याच वेळी शमीचा समावेश एकदिवसीय संघात झाला असून त्याच्यासह शिखर धवन आणि मोहम्मद सिराज यांचीही निवड झाली आहे.पहिल्या टी-२० सामन्यानंतर ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग आणि राहुल त्रिपाठी यांच्यासह काही खेळाडू भारतात परततील.
पहिल्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघ :
- रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.
दुसऱ्या व तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघ :
- रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान आणि उमरान मलिक.
एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ :
- रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.
Web Title: Kohli, Pant, Bumrah will play from the second match, Rohit will return from T20 series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.